नेवासाचा पैस नव्हे तर परिसाचा खांब परिसाच्या दर्शना मात्रे भाविकांचे सोने होते
नेवासा (प्रतिनिधी) –
ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी सोहळा भविष्यात देहू-आळंदीच्या दिंडीप्रमाणेच भव्य आणि वैभवशाली होईल, असा आशिर्वाद जोग महाराज शिक्षण संस्थेचे गुरुवर्य शांतीब्रह्म मारुतीबाबा कुऱ्हेकर यांनी या सोहळ्यास दिला. त्यांनी भक्तिभावाने पालखीचे दर्शन घेतले आणि ज्ञानेश्वरीच्या पादुकांना वंदन करत भाविकांमध्ये भक्तीरस जागवला.
नेवासेतील या दिंडी सोहळ्याचे यंदा ५६वे वर्ष असून, रामभाऊ महाराज राऊत आणि देविदास महाराज म्हस्के यांच्या प्रेरणेतून हा सोहळा अधिक व्यापक झाला आहे. यामध्ये तब्बल २८ दिंड्या सहभागी असून, नव्याने तयार करण्यात आलेल्या भव्य चांदीच्या रथात ज्ञानेश्वरीची पालखी मिरवते आहे. पालखी ज्या ज्या ठिकाणी थांबते, तेथे भाविक मोठ्या भक्तिभावाने तिचे स्वागत करतात.
या सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्रातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच अहिल्यानगर येथे निवृत्ती महाराजांच्या पादुकांनी ज्ञानेश्वरीच्या पादुकांना वंदन केले. ही गुरुबंधूंची भेट वारकरी वर्तुळात आणि विविध माध्यमांत चर्चेचा विषय ठरली आहे.
दिंडीच्या मार्गावर अनेक संत, महंत, राजकीय नेते आणि वारकरी या सोहळ्यास भेट देऊन दर्शन घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर गुरुवर्य मारुतीबाबा कुऱ्हेकर यांनीही विशेष उपस्थिती दाखवत पालखीचे दर्शन घेतले आणि दिंडी मार्गदर्शक देविदास महाराज म्हस्के यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला.
या वेळी बोलताना गुरुवर्यांनी नेवासेच्या ज्ञानेश्वर मंदिर निर्मितीतील बन्सीबुवा तांबे यांच्या योगदानाचा गौरव केला. मामा दांडेकर यांच्या आदेशाने ज्ञानेश्वरी देवस्थानाचा जीर्णोद्धार करणाऱ्या तांबे बुवांचे स्मरण करत त्यांनी सांगितले की, “नेवास्याच्या पावन भूमीतून निघणाऱ्या या ज्ञानेश्वरी दिंडीला भविष्यात देहू-आळंदीच्या पंढरीप्रेमींच्या दिंड्याइतकेच महत्त्व प्राप्त होईल.”
ही दिंडी नेवासा तालुक्यातील वारकरी परंपरेची साक्ष आहे आणि तिचा गौरव दिवसेंदिवस वाढत असल्याचे या सोहळ्याच्या भव्यतेवरून स्पष्ट दिसते.