spot_img
spot_img
Homeअध्यात्मिकदेगलूरकर परंपरेतील नाथ पूर्व कालीन सर्वात प्राचीन हस्तलिखित ज्ञानेश्वरीची आणि ग्रंथ रचनास्थानाच्या...

देगलूरकर परंपरेतील नाथ पूर्व कालीन सर्वात प्राचीन हस्तलिखित ज्ञानेश्वरीची आणि ग्रंथ रचनास्थानाच्या ‘ पैस’खांबाची भेट

जगातील सर्वात जुनी हस्तलिखित ज्ञानेश्वरी असल्याचा दावा…

नेवासा। गुरुप्रसाद देशपांडे

इतिहास नेहमी ग्रंथांतच सापडतो असे नाही. कधी तो जपला जातो घराण्यांच्या स्मृतींत, साधकांच्या परंपरांत आणि पिढ्यान्‌पिढ्या वाहत आलेल्या श्रद्धेत. नेवासा येथील पैसखांबाशी माघ शुद्ध द्वितीयेच्या दिवशी घडलेला पुरातन हस्तलिखित ज्ञानेश्वरीचा पूजन सोहळा हा अशाच जिवंत इतिहासाचा प्रसंग होता—

नेवासा हे संत ज्ञानेश्वर माऊलींचे कर्मक्षेत्र. पैसखांब म्हणजे ज्ञानेश्वरी रचनेचा साक्षीदार. सतीश देगलूरकर हे. सद्गुरू चूडामणि महाराज देगलूरकर यांचे आठवे वंशज.देगलूरकर कुटुंबाची इच्छा केवळ पैस खांबाच्या दर्शनाची नव्हती; ती होती त्यांच्याकडे असलेल्या हस्तलिखित ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या आध्यात्मिक परंपरेला पुन्हा त्या मूळ स्थळी नेण्याची.

देगलूरकर हे नाव महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाच्या उच्च स्थानावर आहे वारकरी संप्रदायाच्या प्रचार प्रसार मध्ये हे नाव म्हणजे पारमार्थिक परंपरेविषयी सर्वसाधारण ओळख आहे पूजनीय गुंडा महाराज देगलूरकर तसेच अलीकडील पूजनीय चंद्रशेखर महाराज व चैतन्य महाराज देगलूरकर यांच्यापुरतीच मर्यादित नाहीतर या परंपरेची मुळे संप्रदायात खोलवर आहेत.

देगलूर येथील पूजनीय चूडामणि महाराज हे संत सुमारे चारशे वर्षांपूर्वी होऊन गेले. देगलूरमध्ये त्यांची वेदशाळा होती. हा काळ छत्रपती शिवाजी महाराजांचा, जगद्गुरू तुकाराम महाराजांचा. गुंडा महाराज हे चूडामणि महाराजांचे शिष्य होते आणि पुढे जावईही झाले. अशा प्रकारे साधना, गुरु-शिष्य परंपरा आणि कौटुंबिक नातेसंबंध यांची एक अखंड शृंखला निर्माण झाली. ही परंपरा केवळ मौखिक नव्हती; तिच्यासोबत ग्रंथ, हस्तलिखिते आणि विधीही जपले गेले.

या हस्तलिखित ज्ञानेश्वरीचा प्रवास सांगताना सतीश देगलूरकर यांनी सांगितले की, काशी क्षेत्रातील देवनाथ महाराज यांना काशी विश्वेश्वरांची आज्ञा झाली आणि ते श्रीक्षेत्र आळंदी येथे पोहोचले. तेथे त्यांनी ज्ञानेश्वर दर्शनाची तीव्र इच्छा ठेवली आणि असे म्हणतात की ज्ञानेश्वरांनी दर्शन दिले नाही म्हणून त्यांनी स्वतःची जीभ कापली नंतर श्री संत ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना दर्शन देऊन ग्रंथराज ज्ञानेश्वरीची एक हस्तलिखित प्रत सुपूर्द केली.
ज्ञानेश्वर माऊलींची देवनाथ महाराज यांना आज्ञा केली की —“मी सांगितलेल्या मार्गाने नेवासा येथे जा आणि या ग्रंथाची पैसखांबाशी भेट घडवा.”


मराठी भाषा अवगत नसतानाही देवनाथ महाराजांनी माऊलींच्या आज्ञेनुसार नेवासा येथे पैस खंबापाशी त्या हस्तलिखित ग्रंथाचे वाचन केले आणि, या प्रसंगी साक्षात विष्णू अवतार श्रीमोहिनीराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली उपस्थित होते, अशी श्रद्धा आजही जपली जाते. त्यानंतर ती हस्तलिखित ज्ञानेश्वरी काशीस नेण्यात आली.

कालांतराने माऊलींनी पुन्हा साक्षात्कार देऊन ती प्रत देगलूर येथील भक्त चूडामणि महाराजांकडे देण्याची आज्ञा केली. त्यांनी पुन्हा एकदा ही प्रत ज्ञानेश्वर माऊलींच्या आदेशानुसार माघ महिन्यात सुमारे चारशे वर्षे पूर्वी पैसाखांबाशी आणली होती.

माघ शुद्ध द्वितीया अर्थात धर्मनाथ बीज. हा दिवस योगायोगाने नव्हे, तर परंपरेनुसारच निवडला गेला., चारशे वर्षांची परंपरा पुन्हा एकदा नेवासा येथे ही पुरातन ज्ञानेश्वरी प्रत नेवाशाला आणली.
त्या पुरातन हस्तलिखित ज्ञानेश्वरी प्रतीचे पैसखांबासमोर वैदिक मंत्रोच्चारात समंत्र पूजन करण्यात आले. ज्ञानेश्वर संस्थानाचे विश्वस्त वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के यांच्या उपस्थितीत संस्थानाच्या वतीनेही या ग्रंथाचे विधिवत पूजन झाले.

या सोहळ्याचे साक्षीदार म्हणून शिवाजीराव होन, अशोककाका कुलकर्णी, ह.भ.प. सौ. साधनाताई मुळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रांत धर्माचार्य संपर्क मंडळाचे आबा मुळे, पत्रकार गुरुप्रसाद देशपांडे, ओंकार मुळे, बाळकृष्ण कुलकर्णी गुरुजी यांच्यासह अनेक भाविक उपस्थित होते. त्यानंतर श्रीमोहिनीराज मंदिरातही ग्रंथपूजन संपन्न झाले.

चौकट
नेवासा येथील पैसखांबाशी घडलेले हे हस्तलिखित ज्ञानेश्वरीचे पूजन श्रद्धेपुरते मर्यादित न ठेवता अभ्यासाच्या दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. ज्ञानेश्वरीच्या रचनेचा काळ, तिच्या विविध हस्तलिखित प्रती, त्या प्रतींचा प्रवास आणि संतपरंपरांमधून झालेले जतन -या सर्व बाबींचा अभ्यास आजही सुरू आहे.

देगलूरकर घराण्याकडे असलेली ही नाथ पूर्वकालीन हस्तलिखित प्रत तिची लिपी, लेखनशैली, कागद, शाई, बांधणी आणि जतनपद्धती या दृष्टीने शास्त्रीय परीक्षण होणे गरजेचे आहे. या प्रतीचा नेवासा येथील रचनास्थानाशी जोडलेला परंपरागत संदर्भ, माघ शुद्ध द्वितीयेचा कालसुसंगत उल्लेख आणि चूडामणि महाराजांच्या घराण्यातून जपली गेलेली स्मृती — या सर्व बाबी लोकपरंपरा आणि लिखित इतिहास यांच्यातील संबंध समजून घेण्यास मदत करू शकतात.

आज उपलब्ध असलेल्या ज्ञानेश्वरीच्या विविध हस्तलिखित प्रतींच्या तुलनात्मक अभ्यासातून पाठभेद, ओव्या, शब्दरचना आणि संभाव्य प्रक्षेप यांवर अधिक प्रकाश पडू शकतो. त्यामुळे नेवासा येथे झालेला हा सोहळा श्रद्धा, इतिहास आणि संशोधन यांच्या संगमाचा एक महत्त्वाचा सांस्कृतिक संदर्भ म्हणून नोंदवला जाणे आवश्यक आहे.

चौकट

ज्ञानेश्वरी हा असा ग्रंथ आहे की, जो लेखकाने एकांतात न लिहिता तो थेट लोकांमध्ये सांगितला गेला आणि सचिदानंदबाबा यांनी लिहून घेतला. त्यानंतर साडेतीनशे वर्षांनी संत एकनाथांनच्या स्वप्नात संत ज्ञानेश्वरांनी येऊन समाधी स्थळी बोलवून घेतले. त्यावेळी संत एकनाथांनी ज्ञानेश्वरीतील घुसलेले अपशब्द दुरुस्त करून शुद्ध केली. व सध्या हीच ज्ञानेश्वरी प्रचलित आहे

देगलूरकरंकडे असलेली नाथ पूर्वकालीन ज्ञानेश्वरीची हस्तलिखित प्रत ही प्रचलित ज्ञानेश्वरीपेक्षा वेगळे शब्द असलेले आहे. त्यात अनेक शब्द वेगळे आहेत. देगलूरकर यांच्या परंपरेत त्यांना सांगितल्यानुसार ही प्रत ज्ञानदेवकृत प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांनी लिहिलेली आहे. या ज्ञानेश्वरीमध्ये पसायदान ऐवजी पासायदान असे लिहिले आहे जे खळांची व्यंकटी सांडो ऐवजी वांकुडे मोडो असे लिहिले आहे व बरेच शब्द वेगवेगळे आहेत

संत चूडामणि हे चारशे वर्षांपूर्वी होऊन गेले. त्यामुळे या हस्तलिखित ज्ञानेश्वरीचे वय साडेचारशे वर्षे असल्याचे सांगितले जाते. १९९९ मध्ये या हस्तलिखिताच्या आठवी अध्यायाच्या अठराही अध्ययांचे प्लास्टिक लॅमिनेशन करून हा प्राचीन वारसा श्री सतीश देगलूरकर यांनी तीन सिद्ध संत हस्तस्पर्शित प्रत जपलेली आहे.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
27.2 ° C
27.2 °
27.2 °
25 %
1.5kmh
0 %
Thu
26 °
Fri
32 °
Sat
32 °
Sun
33 °
Mon
34 °

Most Popular

error: Content is protected !!