परंपरेचा दिव्य वारसा आजही उजळतोय!
नेवासा (प्रतिनिधी) : संतज्ञानेश्वरांच्या भूमीत, श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नेवासे नगरीत पाडव्याच्या सायंकाळी भक्ती, भावना आणि प्रकाश यांचा संगम घडला. श्री चक्रधर स्वामी देवस्थानाच्या प्रांगणात हजारो दिव्यांच्या तेजाने दिपमाळा उजळल्या, जणू भक्तांच्या अंतःकरणातील श्रद्धेचे ज्योत अखंड प्रज्वलित झाल्या.
शके ११९५, दि. ११ डिसेंबर १२७३ रोजी याच पवित्र स्थळी श्री चक्रधर स्वामींनी साजरी केलेल्या आनंददायी दिवाळीच्या स्मृतींना उजाळा देत, या वर्षीही त्या दिव्य परंपरेची अखंड जपणूक करण्यात आली याच ठिकाणी चक्रधर स्वामींना दिव्य ज्ञान प्राप्त झाल्याची कथा आहे. भक्तांच्या ओंजळीतून वाहणारा प्रकाश जणू त्या काळातील स्वामींच्या उपदेशाचे तेज आजही अनुभवायला लावत होता.
या दीपोत्सव सोहळ्यात वैराग्यमूर्ती सर्वविद आचार्य प.पू. श्री मोठेवाजी (जाधववाडी), देवस्थानचे महात्मा शाममुनी अंकुळनेरकर, समाजसेवक रमेशअण्णा मुळे, स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठानच्या प्रमुख सौ. अमृताताई नळकांडे, डॉ. करणसिंह घुले, बालेंद्र पोतदार, बाळासाहेब देवखिळे, , चैतन्य फुलसौंदर, कृष्णा व निलेश भणगे, तसेच भैरवनाथ वाघमारे, निवृत्ती पवार, उत्तम फुलसौंदर, शामभाऊ काळे, नानाभाऊ नवले, किशोर घोडेचोर, उमाकांत जामदार आदींनी उपस्थिती लावून भक्तीचा हा दिव्य उत्सव अधिकच मंगलमय केला.
रांगोळीच्या रंगांतून, दिव्यांच्या ओळींतून आणि आरतीच्या स्वरांतून भक्तिभावाचे सौंदर्य खुलून आले. आरती फुलसौंदर, पल्लवी फुलसौंदर, स्वाती ताठे, जयश्री काळे, पल्लवी मते, सुरेखा काळे यांनी कलात्मक सजावटीने परिसर उजळविला. सौ. अमृताताई नळकांडे, डॉ. करणसिंह घुले आणि पोलीस हवालदार अजय साठे यांच्या शुभहस्ते श्री चक्रधर स्वामींच्या पवित्र स्थानाची आरती सादर होताच भाविकांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू झळकले.
समाजसेवक जयप्रकाश खोत यांनी उपस्थितांना श्री स्वामींच्या तत्वज्ञानाचे स्मरण करून भावनिक प्रेरणादायी मार्गदर्शन दिले. देवस्थानचे उत्तराधिकारी धनंजय महाराज यांनी “ही परंपरा केवळ दीपोत्सव नाही, तर भक्तीच्या अखंड ज्योतीची साधना आहे,” असे सांगत भाविकांचे आभार मानले.
नितीन अग्रवाल (शेंदूर्णी) यांचे विशेष सहकार्य लाभलेल्या या दीपोत्सवासाठी नेवासा, नेवासा फाटा, कौठा, भेंडा, भानसहीवरे, करजगाव, वांजुळपोई आदी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. संपूर्ण परिसरात “जय श्री चक्रधर!”च्या घोषांनी दुमदुमून गेली ती रात्र – जणू प्रकाश, श्रद्धा आणि आनंदाचा दिव्य संगमच घडला होता.

