नेवासा, ता.१३ – श्रीगुरुदेव दत्तपीठ श्रीक्षेत्र देवगड संस्थान येथे शुक्रवार दि. २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत भगवान श्री दत्तप्रभूंचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. सात दिवस चालणाऱ्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण आणि श्री दत्त याग सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
या सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे दिवसभर चालणारे कीर्तन व प्रवचनांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांसाठी दररोज अन्नदान, चहापाणी आणि विविध अध्यात्मिक उपक्रमांचे नियोजन करण्यात आले असून भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

गुरुवार दि. ४ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता लाखो भक्तांच्या आणि मान्यवर संत-महंतांच्या उपस्थितीत भगवान श्री दत्तप्रभूंचा जन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी पूजनीय महंत भास्करगिरी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी केली जात आहे.
भक्तांच्या सोयीसाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून वाहतूक, निवास, भोजन, वैद्यकीय सेवा अशा सर्व सुविधा नियोजनबद्ध रीतीने उभारल्या जात आहेत. आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, वीज वितरण कंपनी आदी सर्व यंत्रणा सज्ज आहेत.
नेवासा पोलीस स्टेशनचे निरीक्षक महेश पाटील यांनी अलीकडेच देवगड येथे बंदोबस्ताच्या दृष्टीने पाहणी केली. राज्य परिवहन महामंडळाने गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, नेवासा आणि अहिल्यानगर येथील डेपोमधून भक्तांसाठी विशेष बसेसची व्यवस्था केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देवगडकडे येणाऱ्या मार्गांची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू आहे. देवगड फाटा, माळेवाडी, नेवासा खडका फाटा मार्गावरील खड्डे बुजवणे, डांबरीकरण व पूलांची दुरुस्ती अशी कामे वेगाने पूर्ण केली जात आहेत.
या कामावर कार्यकारी अभियंता युवराज कोकरे, उपअभियंता पाटील आणि शाखा अभियंता बी.टी. सोनवणे हे अधिकारी देखरेख करत असून ठेकेदार आर.व्ही. जाधव व बी.एस. सोनवणे यांच्या मार्फत काम सुरू आहे. येत्या काही दिवसांत सर्व व्यवस्था सुरळीत पूर्ण होणार असल्याची माहिती श्रीगुरुदेव दत्तपीठ संस्थानकडून देण्यात आली.

