नेवासा : पत्रकार नाथा शिंदे याच कडून
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी नेवासा येथे आयोजित पत्रकार दिनानिमित्त पत्रकार संवाद कार्यक्रमात मतदारसंघाच्या विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली. संत ज्ञानेश्वर महाराजांशी संबंधित असलेल्या नेवासा तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा संसदेत मांडून तेथे आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारच्या संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना त्यांनी अहिल्यानगर-संभाजीनगर महामार्ग, प्रस्तावित रेल्वेमार्ग तसेच मतदारसंघातील अंतर्गत रस्त्यांच्या विकासावर विशेष भर देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. दळणवळण व्यवस्था मजबूत झाल्यास या परिसराचा आर्थिक व पर्यटन विकास अधिक वेगाने होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विरोधी पक्षात असूनही आतापर्यंत संसदेत ११८ प्रश्न उपस्थित करून विविध लोकहिताचे मुद्दे मांडल्याचेही त्यांनी नमूद केले.
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना वाकचौरे यांनी मतदारसंघातील पत्रकारांसाठी पत्रकार भवन उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल तसेच पत्रकारांसाठी संसद अध्ययन दौरा आयोजित करण्याचे आश्वासन दिले.
नेवासा येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात सुधीर चव्हाण यांनी प्रास्ताविक केले, बाळासाहेब सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले तर संदीप गाडेकर यांनी आभार मानले. यावेळी नेवासा तालुका सहकार सेनेचे अध्यक्ष बालेंद्र पोतदार, सुभाष कडू, कैलास शिंदे, अशोक डहाळे यांच्यासह तालुक्यातील अनेक पत्रकार व मान्यवर उपस्थित होते.

