नेवासा (प्रतिनिधी) : संत तुकोबांची गाथा पाचवा वेद असल्याचे प्रतिपादन हभप अंकुश महाराज जगताप यांनी केले
तीर्थक्षेत्र नेवासा येथील जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर येथे तुकाराम बीज उत्सवानिमित्त आयोजित गाथा पारायण सोहळ्याला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते
तुकाराम महाराज मंदिराचे उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडत असून परिसरात हरिनामाचा अखंड गजर सुरू झालं आहे.
संत तुकोबारायांच्या गाथा ग्रंथाला ‘पाचवा वेद’ मानले जाते. या गाथेचे पारायण प्रत्येकाच्या जीवनात आध्यात्मिक परिवर्तन घडविणारे ठरते, असे प्रतिपादन संत तुकाराम महाराज देवस्थानचे विश्वस्त भागवताचार्यअंकुश महाराज जगताप यांनी उद्घाटनप्रसंगी केले. गाथा केवळ वाचनापुरती न ठेवता ती आचरणात आणण्याचे आवाहनही त्यांनी भाविकांना केले.
या सोहळ्याचा शुभारंभ अंकुश महाराज जगताप यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी उपस्थित भाविकांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात हरिनाम संकीर्तन केले.

सोहळ्यात व्यासपीठ प्रमुख म्हणून हभप नामदेव महाराज जाधव (शास्त्री) तसेच काका महाराज पळसवाडीकर सेवा देत आहेत.दि. २६ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत हा गाथा पारायण सोहळा संपन्न होत आहे. दररोज सकाळी ७ ते ११.३० या वेळेत गाथा पारायण, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, तर रात्री ७.१५ ते १० या वेळेत विश्वस्त भागवताचार्य हभप अंकुश महाराज जगताप यांच्या सुश्राव्य वाणीतून श्रीमद् भागवत कथा असा दैनंदिन कार्यक्रम सुरू आहे. त्यामुळे मंदिर परिसरात सकाळपासून रात्रीपर्यंत अध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तुकाराम बीजेच्या मुख्य दिवशी, गुरुवार दि. ५ मार्च रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत प्रमुख महंत हभप उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांचे काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर गाथा पारायण सोहळ्याची सांगता होणार आहे
तुकाराम बीजेनिमित्त आयोजित कथा श्रवण व गाथा पारायणाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन श्री उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर आणि अंकुश महाराज जगताप यांनी केले आहे.

