न्यायालयाचा मोठ्ठा दणका, सहा लाखांची भरपाई अनिवार्य
नेवासा – चेक देऊन आर्थिक फसवणूक करणाऱ्यांसाठी हा निकाल इशाराच ठरला आहे. नेवासा येथील पाणी जार व्यावसायिक अंबादास पोपट लोखंडे (रा. लोखंडे गल्ली, पावन गणपती मंदिर शेजारी, नेवासा फाटा) यांना फिर्यादीस सहा लाख रुपये भरपाई एक महिन्याच्या आत देण्याचे स्पष्ट आदेश अहमदनगर जिल्हा न्यायालयाने दिले आहेत. ठरलेल्या कालावधीत ही रक्कम न भरल्यास दोन महिन्यांची सक्त मजुरी भोगावी लागणार असून, न्यायालयाने कोणतीही नरमाई न दाखवता ठाम भूमिका घेतली आहे.
याचिका क्रमांक 6399/2022 अंतर्गत उधारीच्या व्यवहारातून साडेसहा लाखांचा चेक देऊन तो वटवू न दिल्याने फिर्यादीची आर्थिक फसवणूक झाली. मध्यंतरी तडजोड करूनही आरोपीने उर्वरित रक्कम देण्यास नकार दिल्याने प्रकरण गंभीर झाले. अखेर अतिरिक्त मुख्य दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस. व्ही. इनामदार यांनी दोष सिद्ध ठरवत कडक आदेश दिले. या निकालामुळे चेक बाउन्ससारख्या फसवणुकीला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून, समाजात कायद्याची दहशत निर्माण करणारा हा निर्णय मानला जात आहे.

