खऱ्या अर्थाने गावची सेवा करताना गावच्याच झालेल्या ग्रामसेविका- अशोकराव ढगे
नेवासा
– गावातील मातीशी नातं जडलेलं असतं, आणि जेव्हा ती माती मागे टाकून जावं लागतं, तेव्हा अश्रूंना वाट मोकळी होते…
असाच एक हृदयस्पर्शी क्षण खेडले काजळी गावात अनुभवायला मिळाला, जेव्हा ग्रामसेविका श्रीमती राणी झिरपे यांचा निरोप समारंभ पार पडला. शेवगाव येथे बदली झालेल्या राणी ताईंच्या निरोपासाठी सारा गाव एकवटला होता – जणू घरातलीच एक व्यक्ती घर सोडून निघते आहे, अशा भावनेने प्रत्येक चेहरा ओथंबून गेला होता.
ग्रामसेविका म्हणून राणी झिरपे यांनी केवळ काम केले नाही, तर खऱ्या अर्थाने गावाची सेवा करताना गावाच्या सुखदु:खात वाटेकरी झाल्या. लोकांशी जोडलेले बंध इतके घट्ट झाले होते, की निरोपाच्यावेळी बोलताना त्यांचे डोळे भरून आले. त्यांच्या अश्रूंनी गावकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी आणले. त्या म्हणाल्या, “या गावाने मला केवळ काम करण्याची संधी दिली नाही, तर मायेचा स्पर्श दिला. मी कायम तुमच्या ऋणात असेन.”
नवीन ग्रामसेविका श्रीमती मनीषा तोरणे-गोरे यांचेही उत्साहाने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू डॉ. अशोकराव ढगे होते. त्यांनीही आपल्या भाषणात भावनिक स्वर पकडत, “ही माती हीच खरी गुरुकिल्ली आहे. नवीन पिढीने जातीपातीच्या भिंती पाडून एकोपा साधावा,” असा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी युवक कार्यकर्ते संतोष कोरडे यांनी भावनांनी ओथंबून आभार मानले.
खेडले काजळीने केवळ एक ग्रामसेविका निरोप दिला नाही, तर आपली एक सखी, आपली माया, आणि एक काळजाचा तुकडाच गमावला…