नेवासा – नेवासा न्यायालयासमोरील नेवासा–नेवासा फाटा राज्यमार्गावर वाढत्या वेगवान वाहतुकीमुळे सातत्याने होणाऱ्या अपघातांवर तात्काळ उपाययोजना म्हणून गतिरोधक व रंबलिंग स्ट्रिप बसविण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. यासंदर्भात नेवासा तालुका वकील संघाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांना कठोर भाषेत निवेदन देत त्वरित कार्यवाहीची मागणी केली आहे.
वकील संघाने यापूर्वी अनेक वेळा लेखी व तोंडी स्वरूपात विनंती करूनही पथदुरुस्तीचे काम न झाल्याची खंत व्यक्त केली. दि. ०६ नोव्हेंबर २०२५ रोजी दिलेल्या निवेदनानंतरही संबंधित महामार्गावरील परिस्थिती जसाच्या तशी कायम असून, या दुर्लक्षामुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याचे संघाने निदर्शनास आणून दिले. याच पार्श्वभूमीवर आज दि. ०८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी सुमारे १२ वाजता संघातील एका सदस्याचा अपघात होऊन ते जखमी झाल्याची घटना घडली. या अपघाताने वकील संघाचा संताप अधिकच वाढला असून परिस्थिती गंभीर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
न्यायालयासमोरील महामार्गावर तातडीने गतिरोधक किंवा रंबलिंग स्ट्रिप बसविण्यात यावे, अन्यथा सोमवार दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून नेवासा–नेवासा फाटा मार्गावरील मार्केट यार्ड चौकात तीव्र रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वकील संघाने दिला आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता होणाऱ्या या आंदोलनाचा संपूर्ण परिणाम व जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
वाहतुकीच्या वाढत्या धोक्याचा विचार करून प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडूनही केली जात आहे.

