युवा सेनेच्या उपक्रमाचे तालुक्यात कौतुक
नेवासा (प्रतिनिधी) —
थंड वाऱ्याने अंग गोठले, मुसळधार पावसाने झोपड्या वाहून जाता जाता राहिल्या पण झोपल्यांमध्ये पाणीच पाणी झाले, चुली विझल्या, आणि पोटात भुकेची जळजळ… प्रवरा संगम परिसरातील ऊसतोड कामगारांसाठी गेल्या काही दिवसांत पावसाने आयुष्यच थांबले होते. अशा कठीण क्षणी माणुसकीचा उजेड बनून पुढे आले शिवसेनेचे युवानेते शुभम उगले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले अन्नदान या कामगारांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरले.
पावसाने झोपड्यांत पाणी शिरल्याने महिलांच्या व मुलांच्या डोळ्यांत अश्रू तर पुरुषांच्या चेहऱ्यावर असहायतेची छाया होती. पण युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन गरमागरम अन्नपॅकेट्स वाटले, आणि त्या क्षणी भुकेलेल्या चेहऱ्यांवर उमटलेले समाधानाचे हास्य म्हणजे खरी दिवाळीच वाटली.
या भावनिक अन्नदान उपक्रमात अँड. महेश दिघे, विश्व हिंदू परिषदेचे गजानन गवारे, उपसरपंच काकासाहेब खंडागळे, दीपक आव्हाळे, आबा गव्हाणे, राजेंद्र घावटे, ज्ञानेश्वर उगले तसेच टोका ग्रामस्थ उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नेवासा तालुका युवासेनेच्या या कार्यकर्त्यांनी “माणुसकीची दिवाळी” साजरी केली — ज्यात ना रोषणाई होती, ना फटाके… पण होती तर फक्त भुकेच्या सावलीत उभ्या असलेल्या जीवनांना दिलासा देणारी प्रेमाची ऊब.

