घोडेगावच्या अतिरिक्त तहसील कार्यालयामुळे तालुका विभाजन आणि घोडेगाव तालुका निर्मितीच्या मार्गावर पहिले पाऊल???
नेवासा
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे अतिरिक्त तहसील कार्यालयास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याने तालुक्याच्या संभाव्य विभाजनाची प्रक्रिया अधिक गतीमान होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या निर्णयामुळे भविष्यात स्वतंत्र घोडेगाव तालुका निर्मितीचा मार्ग अधिक मोकळा होणार असल्याचे मानले जात आहे. मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाल्याने घोडेगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अतिरिक्त तहसील कार्यालयाच्या स्थापनेमुळे प्रशासकीय कामकाज स्थानिक पातळीवरच होणार असल्याने नागरिकांची मोठी सोय होणार आहे. महसूल, प्रमाणपत्रे, जमिनीची नोंदणी, विविध दाखले आदी कामांसाठी नेवासा येथे जाण्याची गरज कमी होऊन वेळ, पैसा आणि श्रम यांची बचत होईल. त्यामुळे घोडेगावला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा मिळवून देण्याच्या हालचालींना अधिक बळ मिळाले असल्याची स्थानिकांमध्ये चर्चा आहे
तालुक्यातील 127 पैकी सोनई घोडेगाव, चांदा , वडाळा सर्कलमधील 53 गावांचा समावेश
फुले–शाहू–आंबेडकर बहुजन समाजाचे कार्यकर्ते सुधीर नाथा वैरागर यांनी गेली अनेक वर्षे घोडेगाव तालुका व्हावा यासाठी शासनदरबारी सातत्याने प्रयत्न केले होते. तालुका निर्मितीसाठी आवश्यक सर्व कागदपत्रांसह आदर्श मार्गदर्शक फाईल तयार करून शासनाकडे सादर करण्यात आली होती. त्याच प्रयत्नांना यश येत अतिरिक्त तहसील कार्यालयास मंजुरी मिळाल्याची बातमी समजताच नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून अनेकांनी सुधीर वैरागर यांचे प्रत्यक्ष तसेच भ्रमणध्वनीवरून अभिनंदन केले.
चौकट : संघर्षाचे फळ
घोडेगाव तालुका निर्मितीसाठी तब्बल तेरा वर्षे अभ्यासपूर्ण आणि सातत्यपूर्ण संघर्ष करण्यात आला. शासनाकडे आदर्श मार्गदर्शक फाईल सादर करण्यात आली होती. मंत्रिमंडळ बैठकीत त्या फाईलला मंजुरी मिळाल्याने अतिरिक्त तहसील कार्यालय स्थापन होणार असून भविष्यातील तालुका निर्मितीसाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. — सुधीर वैरागर घोडेगाव

