प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त व महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महसूल विभागाच्या सेवा अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि पारदर्शक बनवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश – तहसीलदार संजय बिरादार
नेवासा :
महसूल व वन विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवाडा’ हे विशेष अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत नेवासा तालुकाभर राबविण्यात येणार असल्याचे तहसीलदार डॉ संजय बिराजदार यांनी सांगितले.

या अभियानांतर्गत विविध उपक्रम युद्धपातळीवर राबवले जाणार आहेत. जेणेकरून सामान्य जनतेच्या दैनंदिन समस्यांचे निराकरण होईल. या ‘सेवा पंधरवाडा’ अभियानाची अंमलबजावणी तीन टप्प्यांत केली जाणार आहे.
पहिला टप्पा : पाणंद रस्ते विषयक मोहीम (१७ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर) – या कालावधीत पाणंद / शिवार रस्त्यांना क्रमांक देणे, त्यांचे सर्वेक्षण करणे, गावाच्या नकाशावर चिन्हांकित करणे आणि निस्तार पत्रकात नोंद नसलेल्या रस्त्यांची नोंद करणे यावर लक्ष केंद्रित केले जाईल. तसेच शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी संमतीपत्रे घेणे आणि प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी ‘रस्ता अदालत’ आयोजित केली जाईल.
दुसरा टप्पा : ‘सर्वांसाठी घरे उपक्रम (२३ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर )या टप्प्यात “सर्वांसाठी घरे” या उपक्रमासाठी पूरक कार्यवाही केली जाईल. यामध्ये घरे बांधण्यासाठी उपलब्ध असलेली शासकीय जमीन
कब्जेहक्काने देणे, शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुसार नियमित करणे आणि अतिक्रमण नियमित केलेल्या तसेच जमीन वाटप झालेल्या लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे वाटप करणे या बाबींवर भर दिला जाईल.
तिसरा टप्पा : नावीन्यपूर्ण
उपक्रम (२८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर) – या अंतिम टप्प्यात जिल्हाधिकारी स्थानिक परिस्थिती व गरजा लक्षात घेऊन नावीन्यपूर्ण उपक्रम राबवतील. या अभियानात स्थानिक लोकप्रतिनिधी जसे की विधानसभा/विधान परिषद सदस्य, संसद सदस्य, जिल्हा ‘ परिषद सदस्य, पंचायत समिती ‘ सदस्य आणि ग्रामपंचायत ‘ सदस्यांना सहभागी करून . घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान केला जाणार आहे. उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानासाठी नियोजन केले असून ते यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे तहसीलदार डॉ संजय बिराजदार यांनी सांगितले.
चौकट –
महसुल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्य सरकारमार्फत महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवड्याचे आयोजन तालुक्यात करण्यात आले असून यामध्ये नागरिक व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. डॉ. संजय बिराजदार, नेवासा तहसीलदार

