नेवाशात राजकीय भूकंप! सेनेला अनेकांचा पाठिंबा
नेवासा, ता. १७ — नेवासा नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट! महायुतीच्या प्रचाराला निर्णायक कल देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी दुपारी तीन वाजता थेट नेवाशात जाहीर सभा घेणार आहेत. नगरपंचायत चौक येथे होणाऱ्या या सभेला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचीही उपस्थिती निश्चित असून, ही सभा अंतिम टप्प्यातील ‘टर्निंग पॉइंट’ ठरेल, असा दावा कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
उद्योजक प्रभाकरराव शिंदे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. करणसिंह घुले आणि सर्व प्रभागांतील महायुतीचे उमेदवार विकासाचा ठोस रोडमॅप मांडत मतदारांपर्यंत पोहोचत असतानाच, शिंदेंची उपस्थिती प्रचाराला नवी धार देणारी ठरणार आहे. दिशा स्पष्ट, विकास ठोस आणि भविष्यासाठी आक्रमक आराखडा—या त्रिसूत्रीवर महायुती उतरल्याने विरोधकांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

