मागणी मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र होणार
नेवासे
महसूल सेवकांना (कोतवालांना) चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी नागपूर येथे सुरू असलेले आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत असून आज या आंदोलनाला २३ दिवस पूर्ण झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कोतवालांनीही सरकारच्या उदासीनतेविरोधात आवाज उठवित शनिवारी नागपूर गाठले असून ते आंदोलकांमध्ये सहभागीझाले
.गेल्या सहा दशकांपासून कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी विविध आंदोलनांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले जात आहे. या काळात महसूल सेवकांनी मुंबई व नागपूर अधिवेशनात मोर्चे काढले, वर्धा ते नागपूर आणि नाशिक ते मुंबई लाँग मार्च केले तसेच २०१९ मध्ये तब्बल ८४ दिवसांचे कामबंद आणि धरणे आंदोलनही झाले. तरीदेखील शासनाकडून फक्त तुटपुंजे मानधन दिले जात असून, योग्य दर्जा न मिळाल्याने महसूल सेवकांमध्ये तीव्र नाराजी आहे.गुजरात आणि त्रिपुरा राज्यांनी १ मार्च १९७९ पासून कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा दिला आहे,
मात्र महाराष्ट्र शासनाने आजपर्यंत हा निर्णय घेतलेला नाही. महसूल सेवक हे पदवीधर व पदव्युत्तर शिक्षित असून ते महसूल, कृषी, आरोग्य, ग्रामविकास, न्याय व विधी, भूमी अभिलेख, निवडणूक, नैसर्गिक आपत्ती व सामाजिक न्याय अशा विविध विभागांच्या योजना गावपातळीवर पोहोचविण्याचे कार्य करतात. त्यामुळे शासनाचा शेवटचा आणि महत्त्वाचा कार्यकारी घटक म्हणून त्यांना योग्य दर्जा मिळणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष योगेश मिसाळ, मार्गदर्शक राजेश गुंजाळ, विनोद कुठे, महेश देशमुख, संदीप गाडेकर, अंकुश कोळेकर, महिला आघाडी प्रमुख मेघना दळवी, नेवासा तालुका प्रमुख संजय भालेकर, उपाध्यक्ष अशोकराव वाघमारे, बाळासाहेब चौधरी, सुभाष माहासिकार, संजय खरड, कानिफनाथ ढाकणे, संतोष खोले, पवन वाघचौरे आणि गणेश बिरदवडे यांनी एकत्रितपणे निवेदन सादर करत शासनाने मागणी तातडीने मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

