“रोटरी क्लबचा समाजाभिमुख उपक्रम – ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी डिजिटल ज्ञानदालन उघडले”
नेवासा (प्रतिनिधी) – “समाजऋण फेडायचे असेल तर शिक्षण क्षेत्रात योगदान देणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे,” या विचारसरणीला कृतीत उतरवत रोटरी क्लब नेवासाने गुरुपौर्णिमेच्या दिवशी केलेला संगणक वाटप उपक्रम कौतुकास पात्र ठरत आहे.
गुरुच्या मार्गदर्शनाचा सन्मान करत, नेवासा येथील रोटरी क्लबने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कडा कॉलनी येथे संगणक संच भेट देत विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षणाच्या दारात प्रवेश उघडला. ग्रामीण भागातील मुलांसाठी माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण अधिक सुलभ व आकर्षक करण्यासाठी रोटरी क्लबचा हा प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरत आहे.
या उपक्रमाची खास वैशिष्ट्ये म्हणजे रोटरी क्लबचे सचिव डॉ. किशोर गळनिंबकर हे शाळेचे माजी विद्यार्थी असून, त्यांनी आपल्या बालपणीच्या शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत संगणक संच भेट दिले. अध्यक्ष डॉ. शिवाजी गोरे, सदस्य डॉ. शिवतेज दारुंटे व रोटरी अहिल्यानगरचे प्रमुख श्री. नितीन थाडे सर यांचीही उपक्रमात सक्रिय सहभाग होता
मुख्याध्यापक श्री. जालिंदर वडगणे आणि डॉक्टर किशोर गळनिंबकर यांनी गुरुपौर्णिमेचे महत्व सांगणारी तसेच रोटरीचे कार्य सांगणारी भाषणे केली
कार्यक्रमावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. जालिंदर वडगणे, माजी शिक्षिका श्रीमती घाडगे मॅडम व संपूर्ण शिक्षकवृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व त्यांच्या डोळ्यात झळकणारा आत्मविश्वास हा उपक्रमाचे यश अधोरेखित करणारा ठरला.
रोटरी क्लबचा हा उपक्रम केवळ एक संगणक भेट नव्हे, तर ग्रामीण विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी उभारलेले एक डिजिटल पाऊल आहे. सामाजिक जाणीवेतून प्रेरित अशा उपक्रमांची समाजाला नितांत आवश्यकता आहे. रोटरी क्लब नेवासाने ती वेळेवर ओळखून दिलेली ही देणगी निश्चितच अनुकरणीय ठरणारी आहे.
“

