नेवासेनगरपंचायतीच्या पाणीपुरवठा नोंदी आणि बिलिंगमधील घोर बेफिकीरीमुळे नागरिकांत संताप उसळला आहे. चुकीच्या नोंदींमुळे जादा बिलांची आकारणी झाल्याने नागरिक आर्थिकदृष्ट्या त्रस्त झाले आहेत. या प्रकरणावर नेवासा काँग्रेस कमिटीने थेट हल्ला चढवला असून प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, “नागरिकांवर अन्याय सहन केला जाणार नाही.
काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अंजुम पटेल यांनी सांगितले की, “नगरपंचायत नागरिकांचा विश्वास तोडत आहे. चुकीची बिलं हा तांत्रिक दोष नव्हे तर नागरिकांवर अन्याय आहे. जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे; अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल.”
काँग्रेसने पत्राद्वारे नगरपंचायतीकडे पाणीपुरवठा नोंदींची तपासणी, चुकीची व दुप्पट बिलं रद्द करणे, जादा वसुलीची परतफेड आणि दोषींवर तात्काळ कारवाई या मागण्या सादर केल्या आहेत. “लोकांना लुटणाऱ्या प्रशासनाला आम्ही गप्प बसू देणार नाही,” असा इशारा देत काँग्रेसने लढ्याचा पवित्रा घेतला आहे.
या भूमिकेला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असून अनेकांनी स्वतःच्या बिलांमधील चुका दाखवून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “नगरपंचायत केवळ कर वसुलीपुरतीच जागी आहे; नागरिकांच्या समस्यांकडे डोळेझाक करते,” अशी तीव्र टीका नागरिकांनी केली.
दरम्यान, काही अधिकाऱ्यांनी “तांत्रिक चुका असल्यास दुरुस्ती केली जाईल” असा बचावात्मक पवित्रा घेतला असला तरी काँग्रेसने तो ठामपणे फेटाळला आहे. “आश्वासनं नव्हे, कृती हवी. नाहीतर जनतेचा रस्ता हा आंदोलनाचा रणांगण बनेल,” असा इशारा अंजुम पटेल यांनी दिला.

