नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने
खरिपात पीक विम्याची भरपाई द्या
महसूल चे पंचनामे गृहीत धरून त्वरित विमा भरपाई द्या -मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे यांची राज्य सरकारकडे मागणी
नेवासा
ः राज्यात गेल्या काही दिवसापासून अतीवृष्टी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकार नुकसान भरपाई म्हणून नियमानुसार मदत करेलच, पण नैसर्गिक अपत्तीने शंभर टक्के नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना पीक विमा तातडीने मिळणे गरजेचे आहे.
विमा कंपन्या मात्र मोठे नुकसान होऊनही बोलत नाही. विमा कंपन्यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करुन अथवा महसुल पंचनामे ग्रहीत धरुन आठ दिवसाच्या आत नियमानुसार पिक विमा भरपाई द्यावी. याबाबत शासन स्तरावरुन आदेशीत करावे अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस संभाजी दहातोंडे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात नद्यांना पुर आले बंधारे फुटून गेले. पुराचे पाणी शेतात घुसून पीक वाहून गेले. सतत पावसामुळे खरिपातील बहुतांश पिकांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. पण मिळत असलेल्या माहितीनुसार राज्यात जवळपास ८४ लाख हेक्टरवरील खरिपातील पिके बाधित झाली आहेत. १७ जिल्ह्यांमध्ये हे नुकसान झाले आहे.
अपत्ती, अतीपाऊस, नैसर्गिक संकटाने नुकसान झाले तर ते आर्थिक नुकसान मिळावे खरिपात प्रधानमंत्री पीक विमा योजना यंदा राबवली आहे. या योजनेतून राज्यात ४५ लाख ५२ हजार शेतकऱ्यांनी ५९ लाख ५७ हजार हेक्टवर पीकविमा उतरवलेला आहे. यात प्रामुख्याने अहिल्यानगर जिल्ह्यात २ लाख २३ हजार ५९६ शेतकऱ्यांनी २ लाख ४० हजार ३१० हेक्टर, बीड जिल्ह्यात ४ लाख १७ हजार ६११ शेतकऱ्यांनी ५ लाख १२ हजार ४२० हेक्टर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २ लाख ८७ हजार १५१ शेतकऱ्यांनी ३ लाख ३४ हजार,५२० हेक्टर, धाराशिव जिल्ह्यात २ लाख ६४ हजार ९९३ शेतकऱ्यनी ३ लाख ९६ हजार ७४० हेक्टर, जालना जिल्ह्यात २ लाख ६१ हजार ८२६ शेतकऱ्यांनी ३ लाख १९ हजार ९५० हेक्टर, लातुर जिल्ह्यात ३ लाख ३२ हजार ४८९ शेतकऱ्यांनी ४ लाख ५६ हजार ७६० हेक्टरवर पीक विमा घेतला आहे. एक रुपयांत पीक विमा यंदा बंद झाल्याने ५४१ कोटी ५४ लाख रुपये शेतकऱ्यांनी हप्तापोटी तर एकून विमा कंपनीला २ हजार ४०७ कोटीचा विमा हप्ता दिला गेला आहे. यातून राज्यात ३१ हजार ९७६ कोटी ५७ लाख रुपये संरक्षित झाले आहेत. राज्यातील अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपुर, सोलापुर, जळगाव, सातारा, परभणी, वर्धा, नागपुर, जालना, गोंदिया, कोल्हापुर, नांदेड, ठाणे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड, वाशिम, बुलढाणा, सांगली नंदुरबारर, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यासाठी भातीय कृषी विमा कंपनी या विमा कंपनीकडे तर धाराशीव, लातुर, बीड या जिल्ह्यासाठी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्सुरन्स या कंपनीमार्फत शेतकऱ्यांनी खरिपात पीकविमा उतरवला आहे.
सरकार नुकसान भरपाई म्हणून नियमानुसार मदत करेलच, पण नैसर्गिक अपत्तीने शंभर टक्के नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना पीक विमा तातडीने मिळणे गरजेचे आहे. त्याबाबत शासनाने आदेश द्यावेत असे दहातोंडे यांनी मागणी केली आहे.
‘‘ शासनाकडून केल्या जाणाऱ्या महसुलचे पंचनामे विमा कंपन्यांनी गृहीत धरुन तातडीने विमा भरपाई देणे गरजेचे आहे. मात्र राज्यात विमा घेतलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊनही विमा कंपन्या बोलायला तयार नाहीत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आठ दिवसात नियमानुसार विमा भरपाई देणे गरजेचे आहे.’’
संभाजी दहातोंडे पाटील,
सरचिटणीस, मराठा महासंघ

