नऊ महिला नगरसेविका निवडून येणार अनेक इच्छुकांना कारभारीन उभे करावी लागणार
नेवासे
शेवटी नेवासाच्या राजकारणात दीर्घ झोपेतून उठल्यासारखे हालचाली सुरू झाल्या! तीन वर्षे ‘निवडणुकीचा अलार्म’ वाजूनही कोणी उठत नव्हते; पण आता आरक्षणाची दहीहंडी फुटली आणि आता पळावच लागेल असे म्हणत लगेचच रणशिंग फुंकत काही कामाला लागले आहेत!
आज तहसील कार्यालयात वॉर्डनिहाय आरक्षणाची सोडत झाली आणि नेवासात राजकीय तापमान चक्क ऑक्टोबर हिट सारखं झालं. काही दिवसांपूर्वी नगराध्यक्ष पद सर्वसाधारण खुलं झालं आणि आता वॉर्डांचं आरक्षण आलं की, राजकारणी मंडळींना वाटलं — “आता खरं मैदान भरलं!”
सोडतीमध्ये वॉर्डनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे निश्चित झाले आहे –
वार्ड क्रमांक १ – नागरीकांचा मागास प्रवर्ग (OBC) महिला
वार्ड क्रमांक २ – अनुसूचित जाती (SC) महिला
वार्ड क्रमांक ३ – नागरीकांचा मागास प्रवर्ग (OBC)
वार्ड क्रमांक ४ – सर्वसाधारण
वार्ड क्रमांक ५ – सर्वसाधारण
वार्ड क्रमांक ६ – नागरीकांचा मागास प्रवर्ग (OBC)
वार्ड क्रमांक ७ – सर्वसाधारण महिला
वार्ड क्रमांक ८ – सर्वसाधारण महिला
वार्ड क्रमांक ९ – सर्वसाधारण महिला
वार्ड क्रमांक १० – सर्वसाधारण
वार्ड क्रमांक ११ – सर्वसाधारण
वार्ड क्रमांक १२ – सर्वसाधारण महिला
वार्ड क्रमांक १३ – नागरीकांचा मागास प्रवर्ग (OBC) महिला
वार्ड क्रमांक १४ – नागरीकांचा मागास प्रवर्ग (OBC) महिला
वार्ड क्रमांक १५ – सर्वसाधारण महिला
वार्ड क्रमांक १६ – अनुसूचित जाती (SC) पुरुष
वार्ड क्रमांक १७ – अनुसूचित जमाती (ST)
आता प्रत्येक पक्षात “आपल्याला वॉर्ड मिळाला का?” या प्रश्नावर चर्चा रंगली आहे. सातरा पैकी नऊ जागेवर स्त्रियांना उमेदवारी आहे काहींच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य, तर काहींच्या कपाळावर आठ्या — पण सगळ्यांच्याच मनात एकच विचार, “टिकिट मिळो वा न मिळो, प्रचार सुरू करूच!”
सोडत जाहीर होताच सोशल मीडियावर पोस्टांचा पूर आला. काहींनी लिहिलं “जनतेच्या सेवेसाठी सदैव तयार”, तर काहींनी म्हटलं “यंदा संधी आमचीच”.
आता पुढचं दृश्य ठरलेलं आहे — प्रचारफेरीतील “जय जयकार”, मतदारांना भेटीगाठी, काही ठिकाणी चहाचे कप आणि काही ठिकाणी दिवाळीनंतर सुतळीबॉम्बसारखी वचने!
नेवासाच्या गल्लीबोळात आता चर्चा एकच —कोणाला मिळेल नगरपंचायतीचा प्रभागाचे राजे पद?”राजकारणाचे हे रंगमंच सजले आहे, नट तयार आहेत, पडदा उघडायचा बाकी आहे… आणि प्रेक्षक म्हणजे जनता — तीच ठरवेल, कोण बनेल “नेवासा नगरसेवक”!
—

