अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील खेडले काजळी गाव परिसरात 13 सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाने ढगफुटीचे स्वरूप धारण केले. यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी, मका या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मडकी ओढ्यावरच्या पुलावरून पाणी वाहून गेल्याने सात ते आठ गावांचा संपर्क तुटला. गावातील काही युवकांनी यावेळचे दृश्य कॅमेऱ्यात टिपले.
या पार्श्वभूमीवर कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी तीव्र संताप व्यक्त करून सांगितले की, “पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली आहे. मात्र संकटाच्या काळात त्यांनीच तातडीने पुढे येऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी. याची जबाबदारी त्यांची आहे.”
त्याचबरोबर महाराष्ट्रात पावसामुळे खरीप हंगामाचे अतोनात नुकसान झाले असल्याने राज्य शासनाने केंद्र सरकारकडून तातडीने पाहणी पथक बोलवावे, तसेच केंद्र व पिक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी, अशी मागणी डॉ. ढगे यांनी केली.

