नेवासा | प्रतिनिधी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नेवासा नगरपंचायतीच्या वतीने स्वच्छ भारत दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वच्छतेबाबत समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आणि स्वच्छ भारताच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी चालू असलेल्या स्वच्छता पंधरवड्याच्या अनुषंगाने शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
नेवासा शहरातील बसस्थानक परिसरासह विविध भागांत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी, विद्यार्थी आणि शिक्षक यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभला. या अभियानाद्वारे शहरवासीयांना “स्वच्छता हीच सेवा” या संकल्पनेचा संदेश देण्यात आला.
या प्रसंगी स्वच्छता अभियानाबरोबरच स्वच्छता शपथ व स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीतून विद्यार्थी आणि अधिकारी यांनी नागरिकांना घर-परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी झाडू हातात घेऊन प्रत्यक्ष स्वच्छतेत सहभागी होत समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण घालून दिले.
कार्यक्रमास नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री. निखिल फराटे, लेखापाल विकास घावटे, लेखापरीक्षक संतोष ढोले, नगर अभियंता सुनील गांगुर्डे, कर विभागातील तृप्ती तळेकर, गोरक्षनाथ काळे, स्वच्छता निरीक्षक श्री. भारत चव्हाण, आरोग्य लिपिक योगेश गवळी, शहर समन्वयक तुषार सरगर, आरोग्य मुकादम सुधीर चित्ते व संजीवनी चक्रनारायण यांच्यासह नगरपंचायतीचे २५ हून अधिक कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवर्ग तसेच तब्बल १५० विद्यार्थी स्वच्छता उपक्रमात सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छ करण्याबरोबरच स्वच्छतेबाबत घोषवाक्ये दिली.
नगरपंचायतीच्या या उपक्रमामुळे नेवासा शहरात स्वच्छतेबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून नागरिकांना स्वच्छता व आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. गांधी जयंतीच्या निमित्ताने घेतलेला हा उपक्रम आगामी काळात नेवासा शहराला अधिक स्वच्छ आणि सुंदर बनविण्यास हातभार लावेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

