आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या प्रयत्नाने बाजारपेठेत उलाढाल वाढणार
नेवासा
शहरातील व्यापाऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. नेवासा नगरपंचायतीला वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत व्यापारी संकुल बांधकामासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निर्णयामुळे नेवासा शहरातील जुन्या बाजारपेठेला नवसंजीवनी मिळणार आहे.
या उपक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
नगरपंचायत चौकापासून लक्ष्मी खोलेश्वर मंदिरापर्यंतची बाजारपेठ नूतनीकरणाच्या या प्रकल्पात समाविष्ट असून, व्यापाऱ्यांसाठी सुबक, सुरक्षित व सुसज्ज दुकाने उभी राहणार आहेत. पार्किंगसह पादचारी मार्ग, पावसाचे नियोजनबद्ध ड्रेनेज, आणि स्वच्छतेची पायाभूत सोय या सर्वांचा समावेश असेल.
अतिक्रमणामुळे विस्कळीत झालेल्या बाजारपेठेचा चेहरामोहरा बदलणार असून, नवीन व्यापारी संकुलामुळे आर्थिक उलाढाल वाढेल, रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि शहराचा व्यापारी दर्जा उंचावेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
आमदार विठ्ठलराव लंघे यांनी सांगितले की, “नेवासा शहरातील विविध विकासकामांसाठी पुढील काळातही आपण कटिबद्ध आहोत. बाजारपेठेचे आधुनिकीकरण हे त्याच दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.

