मेलेल्या लम्पिग्रस्त जनावरांमुळे परिसरामध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण नगरपंचायत आणि पशुवैद्यकीय कार्यालयाचे दुर्लक्ष
नेवासा (प्रतिनिधी) –
नेवासा शहरातील मध्यवस्ती मधील सर्व महिलांनी आज आक्रमक पवित्रा घेत नगरपंचायतीवर मोर्चा नेला आणि मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांच्या त्रासाबाबत तीव्र आंदोलन करीत निवेदन सादर केले. या निवेदनावर नगरपंचायत प्रशासनातील अधिकारी निखिल नवले यांनी स्वाक्षरी करून आठ दिवसांच्या आत कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
देशपांडे गल्ली, जुनी कोर्ट गल्ली, मापारी गल्ली या सुशिक्षित व उच्चभ्रू लोकवस्तीच्या भागात अनेक दिवसांपासून भटकी बेवारस गाई–वासरे व कुत्र्यांचा प्रचंड त्रास सुरू आहे. कुत्र्यांनी तर अक्षरशः गल्लीतील नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल केले असून लहान मुलांना भीतीपोटी बाहेर खेळणे तर सोडाच, शाळेत व बालवाडीत जाणेही कठीण झाले आहे. व रात्रभर भुंकण्याने या परिसरातील लोकांच्या झोपा उडालेल्या आहेत
या परिसरातील मोहिनीराज मंदिर, देशमुखांची देवी मारुती मंदिर, दत्त मंदिर व काशी विश्वेश्वर मंदिर या ग्रामदैवताच्या मंदिरांना भाविकांना जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. नवरात्रीच्या दिवसांमध्ये या मंदिरांमध्ये महिलांची मोठी गर्दी असते इतकेच नव्हे तर डॉक्टर करवंदे व डॉक्टर बल्लाळ यांच्या दवाखान्यांमध्ये येणाऱ्या रुग्णांना देखील रस्त्यावरील मोकाट जनावरांमुळे अक्षम्य उशीर होतो आहे.
प्रभागातील देवचक्के यांच्या बालवाडीत व शासनमान्य आणखी एका बालवाडीत शिकणाऱ्या बालकांवर या भटक्या कुत्र्यांच्या भीतीचे गडद सावट असून, पालक आपली मुले जीव मुठीत धरून शाळेत आणतात. शिवाय, बेवारस जनावरांमुळे रस्त्यांवर शेणाचे थर व अस्वच्छता निर्माण होऊन दुर्गंधीचे साम्राज्य झाले आहे.

विशेष म्हणजे लम्पि रोगाने ग्रस्त मेलेले बेवारस वासरू मोहिनीराज मंदिराजवळ असलेल्या जुन्या कोर्टात रस्त्यावर चार दिवस पडलेले आहे पण अनेक वेळा फोन करूनही नगरपंचायतीने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे या आंदोलनाचा उद्रेक झाला. रोगग्रस्त जनावरंमुळे परिसरात देखील रोगराई पसरण्याची शंका व्यक्त होत आहे
यामुळे त्रस्त झालेल्या महिलांनी आज एकत्र येऊन नगरपंचायतीत धडक मोर्चा नेला. “आठ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास मोठ्या आंदोलनाचा इशारा” महिलांनी दिला आहे.

