उपनगरातील अनेकांनी जागून काढली रात्र…
नेवासा प्रतिनिधी –
18 वर्षांनंतर नेवासा पुन्हा एकदा पुराच्या पाण्याने वेढले गेले होते, नागरिकांनी भीषण परिस्थितीचा सामना केला. 2006 नंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर शहर पाण्याच्या घेरावात आले आहे. विक्रमी पाऊस, धरणांतून झालेला प्रचंड विसर्ग आणि नद्यांचा संताप यामुळे शनिवारी नेवासाला पुराचा वेढा बसला.
हस्त नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी शनिवारी नगर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजविला. धरणाच्या लाभक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुळा आणि प्रवरा नद्या रौद्र रूप धारण करून खवळल्या. पाचेगाव येथे मुळा- प्रवरेचा संगम झाल्यानंतर प्रवरेचे पाणी प्रचंड वेगाने नेवाशाला धावून आले. याच प्रवरेवर असलेल्या जायकवाडी प्रकल्पाच्याआधी शेवटच्या मधमेश्वर बंधाऱ्यावरून पाणी थेट ओसंडून वाहू लागले.
मुळा धरणातून तब्बल २५ हजार क्युसेक, तर निळवंडे धरणातून १५ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले. या प्रचंड विसर्गासोबत झालेल्या अविरत पावसामुळे नदीच्या पातळीत विक्रमी वाढ झाली. परिणामी शहराचा श्वासच रोखला गेला. नेवासा येथील ऐतिहासिक गणपती घाटावरील गणपती मूर्तीला पाण्याचा वेढा बसणे, हा पूरस्थितीचा भयानक इशारा मनाला जातो
सायंकाळीच ज्ञानेश्वर मंदिरामागील पुणतगाव रस्ता पाण्याखाली गेला. रस्त्यांवरून नदी वाहू लागल्याने परिसरातील शेतीत पाणी झाले होते. ऊ-दुमाला मार्गावरील नाले उफाळून वाहत असल्याने रानमळा-गायकेवस्तीचा संपर्क पूर्णपणे तुटला. शहरातील ज्ञानेश्वर मंदिर रामकृष्ण नगर, विवेकानंद कॉलनी, देशपांडे नगरातील म्हसोबा मंदिरापर्यंत पाणी घुसले. वकील कॉलनीतील बंगल्यांना पाणी लागल्याने रात्री घराघरात भयानक भीतीचे वातावरण निर्माण झाले.अचानक आलेल्या या पुरामुळे नागरिकांनी रात्रभर झोप मोडून काढली.

