अन्नदाता शेतकऱ्याची सेवा हीच देवपूजा समजून सर्वांनी अस्मानी संकटात मदत करावी असे आवाहन महाराजांनी केले
नेवासा –
महाराष्ट्राचा बळीराजा आज अस्मानी संकटात सापडलेला आहे. धो-धो कोसळणाऱ्या पावसाने शेती वाहून गेली, शेतकऱ्यांचे संसार पाण्यात गडप झाले, पोराबाळांसह लेकरं जगायची कशी ही वेळ प्रत्येक शेतकऱ्यावर ओढवली आहे. डोळ्यादेखत उभे पीक वाहून जाताना पाहून शेतकरी असहाय्य झाला आहे.
अशा दुःखद प्रसंगी “एक मेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ” या ओवीला साजेशा सेवाभावी वृत्तीने नेहमीच समाजकार्यात अग्रेसर राहिलेले गुरुवर्य ह.भ.प. महंत उद्धवजी महाराज मंडलिक (नेवासकर) यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. शेतकऱ्यांचे दु:ख आपल्या मनावर कोरून घेत, त्यांनी नाम फाउंडेशनकडे तब्बल १ लाख रुपयांची देणगी सुपूर्द केली.
यावेळी भावुक होत बोलताना गुरुवर्य महाराज म्हणाले –
“शेतकऱ्यांचे संसार पाण्याच्या प्रलयात वाहून जाताना बघून अंत:करण हेलावून जाते. हे संकट शब्दांच्या पलीकडचे आहे. बळीराजा उभा राहिला पाहिजे, यासाठी शासनासोबत सेवाभावी संस्था आणि समाजातील दानशूर मंडळींनी खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रम, नेवासा व श्री वरदविनायक सेवाधाम, लोणी यांच्या वतीने या मदतकार्याचा भाग होणे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.”
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत, त्यांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे, पण अशा वेळी मदतीचा हात पुढे करणारे महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांसारखे दानशूर आणि सेवाभावी संत हेच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे आधारस्तंभ ठरत आहेत.

