श्रीमती गयाबाई पोपटराव कार्ले यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस कार्यक्रम उत्साहात साजरा
नेवासा प्रतिनिधी –
भावी पिढीला केवळ भौतिक सुखसुविधा देण्यापेक्षा चांगले संस्कार देणे अधिक महत्त्वाचे आहे. मातृ-पितृ पूजनासारखे सोहळे कुटुंबातील नातेसंबंध दृढ करून पुढील पिढीला योग्य मार्ग दाखवणारे ठरतात, असे प्रतिपादन देवगड देवस्थानचे भास्करगिरी महाराज यांनी केले.
भगवान गुरु दत्ताच्या छायेखाली कौटुंबिक जडणघडण झालेल्या श्रीमती गयाबाई पोपटराव कारले यांच्या अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. रामनाथ कारले व कारले कुटुंबीयांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते.
यावेळी आशीर्वाद देण्यासाठी भास्करगिरी महाराज, प्रकाशानंदगिरी महाराज, भगवानजी महाराज जंगले शास्त्रीजी ,विद्याताई हारदे, उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी पंचगंगा उद्योग समूहाचे संचालक बाळासाहेब शिंदे, होते तर कृषी उपसंचालक दीपक गवळी, उपविभागीय कृषी अधिकारी अश्विनी पठारे, श्रीमती जनाबाई जंगले, डॉक्टर रोहिदास चौधरी, डॉ. शशिकांत विप्रदास, संतोष भामरे गुरुजी, विक्रम गोसावी सर, सतीशकुमार संचेती,डॉ. सोमनाथ भास्कर, गणेश भास्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
मयूर जाधव यांनी उपस्थिताचे स्वागत केले प्रास्ताविक करताना महाराष्ट्र कृषी विभागातील सिट्रस इस्टेट ,छत्रपती संभाजीनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी, रामनाथ पोपटराव कारले म्हणाले की पालक आर्थिक अडचण असताना देखील परिस्थितीशी दोन हात करून मुलांना चांगल्या पद्धतीचे शिक्षण देऊन धंद्याला तसेच नोकरीला लायक बनवतात. त्यामुळे पालकांना सांभाळण्याची त्यांचे आदरयुक्त पालन पोषणाची जबाबदारी अर्थातच पाल्यावर असते. आपल्या पालकांना थोडा वेळ द्या. त्यांच्याशी हितगुज करा. त्यांना अन्न पेक्षाही गरज असते ती आदरपूर्वक संवादाची व सन्मानपूर्वक वागणूक देण्याची आवश्यकता असते
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आणि स्वतः अशिक्षित असतानाही धार्मिक संस्कारांच्या बळावर मुलगा व नातवंडांना उच्च शिक्षण देण्याचा ध्यास पूर्ण करणारी माता म्हणून श्रीमती गयाबाई कारले पंचक्रोशीत परिचित आहेत, असे गौरवोद्गार यावेळी मान्यवरांनी काढले.
या सोहळ्यास कारले कुटुंबीयांचे नातेवाईक, कृषी क्षेत्रातील अनेक अधिकारी तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमात श्रीमती गयाबाई कारले यांच्यासह खुपटी येथील शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला.

अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त श्रीमती गयाबाई कारले यांची फुलांनी सजवलेल्या तराजूमध्ये ग्रंथतुला व पेढेतुला करून विशेष सन्मान करण्यात आला.
प्रमुख आशीर्वादपर भाषणात भास्करगिरी महाराज म्हणाले की, वृद्धाश्रम किंवा गोशाळा यांचा अभिमान बाळगण्यापेक्षा आपल्या घरातील वृद्धांची सेवा करणे हेच खरे कर्तव्य आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्या मुला-मुलींची काळजी घेणाऱ्या वृद्धांना शेवटच्या काळात केवळ आपल्या मुला-नातवंडांचा सहवास हवा असतो. त्यामुळे मातृ-पितृ पूजनासारखे कार्यक्रम भावी पिढीला वृद्धांच्या जवळ नेणारे व संस्कार देणारे ठरतात. भौतिक सुविधा देण्याबरोबरच पालकांनी मुलांना संस्कारांची शिदोरी दिली तरच आपली संस्कृती टिकून राहील असे त्यांनी सांगितले.
प्रकाशानंदगिरी महाराज म्हणाले की, वृद्ध आई-वडिलांची सेवा करणे म्हणजे सर्व तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतल्याइतके पुण्य मिळवण्यासारखे आहे. मुलांना केवळ पैसा कमावण्याची यंत्रे बनवण्यापेक्षा संस्कारांनी समृद्ध व्यक्तिमत्त्व घडवणे हेच पालकांचे खरे कर्तव्य आहे.
याप्रसंगी वेदांताचार्य भगवान महाराज जंगले शास्त्रीजी, ह.भ.प. विद्याताई हारदे, कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे तसेच कृषी उपसंचालक दीपक गवळी यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेवन्नाथ पवार यांनी केले, तर आयोजक रामनाथ कारले यांनी उपस्थितांचे आभार मानले

