वीस वर्षापासून मराठा महासंघ वारकरी संप्रदाय आणि विविध संघटना आणि सर्वच राजकीय पक्षांनी उभ्या केलेल्या लढ्याला आले यश…
नेवासा
राज्यातील अतिशय प्रसिद्ध आणि पौराणिक असलेल्या श्री शनैश्वर देवस्थान, शनिशिंगणापूर येथील विश्वस्त मंडळाला भ्रष्टाचाराचे आरोप, गैरव्यवस्थापन, बनावट अॅप घोटाळा, कर्मचारीवर्गातील वाद आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न या पार्श्वभूमीवर अखेर शासनाने बरखास्त केले आहे. महाराष्ट्र शासनाने २२ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेल्या आदेशानुसार, जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांची तात्पुरते प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून समिती गठीत होईपर्यंत तेच देवस्थानचा कारभार पाहणार आहेत. हा आदेश राज्यपालांच्या नावाने जारी करण्यात आला आहे.
शासनाच्या आदेशानुसार, १३ ऑगस्ट २०१८ रोजी श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्तव्यवस्था (शिंगणापूर) अधिनियम, २०१८ राजपत्रात प्रसिद्ध झाला होता. भाविकांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी, पारदर्शक व उत्तरदायित्वपूर्ण प्रशासन घडवण्यासाठी आणि देवस्थानवरील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी हा अधिनियम लागू करण्यात आला होता. सदर अधिनियमाचा प्रत्यक्ष अंमल मात्र २२ सप्टेंबर २०२५ पासून सुरु झाला आहे.
विश्वस्त मंडळाच्या कारभाराखाली असताना,शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त; जिल्हाधिकाऱ्यांकडे तात्पुरता कारभार देवस्थानच्या प्रशासनात आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार,बनावट अॅप्स संदर्भातील घोटाळा, हिंदू व मुस्लिम कर्मचाऱ्यांमध्ये वैमनस्य शनिदेवाच्या चौथऱ्यावरुन वाद, उप कार्यकारी अधिकाऱ्याची आत्महत्या अशा घटना घडल्या.या सर्वांमुळे भाविकांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊन देवस्थानावरील त्यांचा विश्वास डळमळीत झाला होता.
आता नव्या आदेशानुसार, जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनीच देवस्थानचे संपूर्ण प्रशासन, दैनंदिन व्यवहार, वित्तीय बाबी, संपत्तीचे संरक्षण तसेच भाविकांसाठी आवश्यक सेवा-सुविधा जबाबदारीपूर्वक पार पाडायच्या आहेत. ही प्रशासकीय नियुक्ती समिती गठीत होईपर्यंत किंवा शासनाचे पुढील आदेश येईपर्यंतच लागू राहणार आहे.

चौकट
राज्यपालांच्या आदेशानंतर शनिशिंगणापूर परिसरात वारकरी संप्रदाय आणि शनि भक्तांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. “भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक प्रशासनाची अपेक्षा अखेर पूर्ण झाली” अशा प्रतिक्रिया व्यक्त होत असून भाविकांच्या सोयी-सुविधा प्राधान्याने पाहिल्या जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
—

