spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedशिंगणापूर ॲप घोटाळा : विधानसभेत आमदार विठ्ठलराव लंघे पुन्हा आक्रमक, “तपास सीबीआयकडेच...

शिंगणापूर ॲप घोटाळा : विधानसभेत आमदार विठ्ठलराव लंघे पुन्हा आक्रमक, “तपास सीबीआयकडेच द्या”ची जोरदार मागणी

चर्चा पाचशे कोटी रुपयांच्या महा घोटाळ्याची प्रत्यक्षात दोन आरोपीं आणि एकच कोटी रुपयाचा तपास

नेवासा

श्री क्षेत्र शनैश्वर देवस्थानातील बनावट ऑनलाईन ॲपद्वारे झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आमदार विठ्ठलराव लंघे विधानसभेत पुन्हा एकदा आक्रमक झाले. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात त्यांनी हा संपूर्ण घोटाळा राज्य यंत्रणांच्या कुवतीबाहेरचा असून त्याचा तपास थेट सीबीआयकडे देण्यात यावा, अशी जोरदार मागणी केली.

आमदार लंघे पुढे म्हणाले की, जगप्रसिद्ध शनैश्वर देवस्थानात सुमारे सहा महिन्यांपूर्वी ऑनलाईन ॲप, क्यूआर कोड आणि पावती पुस्तकांच्या माध्यमातून देश-विदेशातील शेकडो भाविकांची कोट्यवधी रुपयांची लूट झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी मागील पावसाळी अधिवेशनात लंघे यांनीच प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही देवस्थानातील भोंगळ कारभार सभागृहात उघड करत, सायबर क्राईमच्या उच्चस्तरावर तपास केला जाईल, असे स्पष्ट आश्वासन दिले होते.

मात्र प्रत्यक्षात अहिल्यानगर सायबर क्राईम विभागानेच संपूर्ण तपास केल्याचे समोर आले. अधिवेशनाच्या तोंडावर घाईघाईने देवस्थानातील केवळ दोन कर्मचाऱ्यांना अटक करून एक कोटी रुपयांपर्यंत चोरी झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. हा तपास अत्यंत असमाधानकारक व संशयास्पद असल्याचा गंभीर आरोप लंघे यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, सात बनावट ॲप कार्यरत होती, प्रत्येक ॲपवर दोन लाखांहून अधिक सबस्क्रायबर होते आणि प्रत्येकी १८०० रुपयांची देणगी आकारली जात होती. केवळ एका ॲपमधून ३६ कोटी रुपये जमा झाल्याची माहिती असताना, एकूण घोटाळा ५०० कोटींच्या घरात गेल्याची चर्चा भाविकांमध्ये आहे. अशा परिस्थितीत पोलिसांनी फक्त दोन आरोपी आणि एक कोटी रुपयांवरच तपास मर्यादित ठेवणे म्हणजे ‘डोंगर पोखरून उंदीर’ काढल्यासारखे हास्यास्पद चित्र असल्याची बोचरी टीका त्यांनी केली.

सर्व व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने झालेले असल्यामुळे संबंधित खात्यांचे तपशील सहज मिळू शकतात आणि पैसे ज्या खात्यांमध्ये गेले त्या सर्वांना ताब्यात घेणे शक्य आहे. मात्र वेळ जाईल तितके पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न होतील. त्यामुळे भाविकांच्या श्रद्धेची लूट करणाऱ्या या महास्कॅमचा निष्पक्ष, पारदर्शक आणि सखोल तपास सीबीआयकडेच देण्यात यावा, अशी ठाम मागणी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी शासनाकडे केली.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
29.1 ° C
29.1 °
29.1 °
22 %
3kmh
1 %
Sun
26 °
Mon
29 °
Tue
30 °
Wed
31 °
Thu
31 °

Most Popular

error: Content is protected !!