शेकडो धारकरी तरुणांसह ज्येष्ठांनी घेतला सहभाग
नेवासा प्रतिनिधी –
हिंदू संस्कृतीच्या जागृतीसाठी आणि धर्माभिमानाच्या जाज्वल्य तेजाची जाणीव करून देण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नेवासा विभागाच्या वतीने दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी श्री दुर्गामाता दौड मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
सकाळी साडेसात वाजता मळगंगा देवी मंदिरात प्रेरणामंत्र घेऊन दौडीची सुरुवात झाली. सर्व धारकरी बांधव डोक्यावर पांढरी गांधीटोपी, गळ्यात भगवे उपरणे परिधान करून दोनच्या रांगेत शिस्तबद्ध चालत होते. चालतांना धर्मगीतांची पद्ये म्हणत, जयघोष करत, “जय भवानी – जय शिवराय”चा गजर करीत वातावरण भगवामय झाले.
दुर्गामाता दौड मिरवणूक खोलेश्वर गणपती चौक, नगरपंचायत चौक, श्रीतुकाराम महाराज मंदिर, लोखंडे गल्ली, हेडगेवार चौक, मारुती चौक, मोहिनीराज मंदिर, करवंदे हॉस्पिटल, शहिद जवान चौक, कडू गल्ली, श्रीरामपूर रोड या प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत परत खोलेश्वर गणपती चौक – नगरपंचायत चौक मार्गे श्री दुर्गामाता मंदिरात ध्येयमंत्राने सांगता झाली.
या प्रसंगी जोश पूर्ण घोषणांनी नेवासा दुमदुमून गेला. हिंदुत्वाचे अभेद्य दर्शन घडवणाऱ्या या ऐतिहासिक दौडीत युवकांसह अनेक जेष्ठ कार्यकर्त्यांनीही उत्साहाने सहभाग नोंदविला.

