पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांच्यासह मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आमदारांचे मानले आभार
नेवासा- प्रतिनिधी नाथा भाऊ शिंदे, याजकडून
तालुक्यातील सुरेगाव गंगा रोड, नेवासा बुद्रुक येथील श्री सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमास राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना अंतर्गत “ग्रामीण तीर्थक्षेत्र ब वर्ग दर्जा” बहाल केला आहे. अधिकृत पत्र आश्रमास प्राप्त झाले. या ऐतिहासिक क्षणाची घोषणा करताना आश्रमाचे प्रमुख गुरुवर्य ह.भ.प. महंत उद्धवजी महाराज मंडलिक, नेवासेकर यांच्या मुखातून भक्तिभावाने शब्द झरले.
सद्गुरूंच्या स्थापनेपासून भाविकांचा वाढता ओघ हेच आश्रमाच्या दिव्यता व महात्म्याचे प्रतीक आहे. मात्र वाढत्या भाविकसंख्येमुळे काही अडचणी निर्माण होत होत्या. “भाविकांची सेवा म्हणजेच ईश्वरसेवा, आणि त्या सेवेला साजेशा सुविधा उभारणे हीच खरी साधना,” असे सांगून उद्धवजी महाराजांनी शासन निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
“आज सद्गुरूंच्या कृपेने आश्रमास ब वर्ग दर्जा लाभला. हा क्षण आमच्या वारकरी संप्रदायासाठी स्मरणीय आणि ऐतिहासिक आहे. वारकऱ्यांच्या सेवेला आता नवे परिमाण मिळाले आहे,” अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
या यशामध्ये सतत प्रयत्नशील राहून मार्गदर्शन करणारे जलसंपदा मंत्री व पालकमंत्री अहिल्यानगर मा.ना. राधाकृष्ण विखे पाटील तसेच जि.प. अध्यक्षा मा.सौ. शालिनीताई विखे पाटील यांचे वारकरी भाविकांच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले. तसेच मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा.ना. अजितदादा पवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार विठ्ठलराव लंघे यांचे कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
या निर्णयामुळे आश्रमाच्या सेवाकार्यात नवा अध्याय सुरू होणार असून, भाविकांसाठी सुखसोयी उपलब्ध करून देण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे. हे खरेच भक्ती, सेवा व सद्गुरू कृपेच्या संगमाचे दैवी फळ असल्याची भावना वारकरी भाविकांनी व्यक्त केली.

