स्वप्निल मापारी यांच्या प्रचाराची भावनिक सुरुवात
नेवासा :
नेवासा नगरपंचायत निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १० मधील राजकीय वातावरण आज अधिकच भावुक झाले. स्वर्गवासी ज्येष्ठ समाजसेवक राजेंद्र मापारी आणि स्वर्गवासी नगरसेविका सौ. सीमाताई मापारी यांच्या चिरंजीव स्वप्निल राजेंद्र मापारी यांनी आज दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराचा शुभारंभ केला. ग्रामदैवत श्री मोहिनीराज भगवान यांच्या मंदिरासमोर नारळ फोडून, हात जोडून, डोळ्यात अश्रू दाटून आलेल्या वातावरणात हा प्रचार प्रारंभ झाला.
केवळ दोन महिन्यांपूर्वी प्रभाग क्रमांक १० ला हादरवून सोडणारी दुर्दैवी घटना घडली होती. हृदयविकाराच्या झटक्याने समाजहितासाठी आयुष्य झिजवणारे राजेंद्र मापारी यांचे निधन झाले आणि काहीच दिवसांत त्यांच्या जोडीदार असलेल्या कार्यकर्त्यांची आधारवड सौ. सीमाताई मापारी यांचेही दुःखद निधन झाले. या दुहेरी आघातानंतर मापारी कुटुंब, नातेवाईक आणि प्रभागातील नागरिक अजूनही सावरत असतानाच, त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या जनसेवेच्या संकल्पाला पुढे नेण्याचा निर्णय स्वप्निल यांनी घेतला आहे.
“बाबांची शेवटची इच्छा पूर्ण करायची आहे… प्रभाग १० चा विकास थांबू देणार नाही”— या भावनेने स्वप्निल मापारी यांनी उमेदवारी दाखल करताच जनतेत एक वेगळीच लाट उसळली. आजच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक, महिला, ज्येष्ठ मंडळी, युवक एकत्र जमले. अनेकांनी स्वप्निल यांना मिठी मारत “तुम्ही पुढे या, आम्ही तुमच्या सोबत आहोत” असा भावनिक पाठींबा व्यक्त केला.
या प्रसंगी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री नंदकुमार पाटील, माजी नगराध्यक्षांचे पती सतीश पिंपळे, तसेच प्रभागातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सर्वांनी एकमताने, “स्व. राजेंद्र मापारी हे प्रभाग १० साठी वटवृक्ष होते. त्यांचे कार्य आता स्वप्निल मापारी पुढे नेतील, ही आमची खात्री आहे,” असे मनोगत व्यक्त केले.
स्वप्निल मापारी यांनी आपल्या भाषणात अत्यंत भावुक होत म्हटले—
“माझ्या आई-वडिलांनी आयुष्यभर प्रभागातील माणसांसाठी काम केले. त्यांची सेवा, त्यांचा आशीर्वाद आणि त्यांची शेवटची इच्छा मला या मार्गावर घेऊन आली. प्रभाग क्रमांक १० चा मुलगा म्हणून, हेच माझं कर्तव्य आहे.”
नेवासा नगरपंचायत निवडणुकीच्या या रंगतदार वातावरणात, आजचा दिवस प्रभाग क्रमांक १० साठी भावनिक ठरला. मापारी कुटुंबाच्या जनसेवेच्या परंपरेला नवं पंख देण्यासाठी स्वप्निल मापारी आत्मविश्वासाने पुढे सरसावले आहेत.

