घोडेगावात हृदयद्रावक घटना : पाणीपुरवठा तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू, एक बेपत्त –
घोडेगाव दिलीप शिंदे याच कडून
येथील अनेक वर्षांपासून रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या चार मित्रांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला असून एक जण रात्री उशिरापर्यंत बेपत्ता आहे. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रथमेश सुभाष काळे आणि जीवन रवींद्र आव्हाड (वय अंदाजे १८, रा. घोडेगाव) अशी मृत तरुणांची नावे असून शोएब अयुब शेख हा युवक अद्याप बेपत्ता आहे. तर चौथा मित्र रिहान अन्वर शेख हा सुदैवाने बचावला आहे.
सोनई रोडलगत असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम अनेक वर्षांपासून रखडलेले असून त्या ठिकाणी मोठा तलाव तयार झाला आहे. मंगळवारी दुपारी चार मित्र पोहण्यासाठी त्या तलावाकडे गेले होते. त्यावेळी प्रथमेश पाण्यात बुडू लागल्याचे पाहताच सोबत असलेल्या मित्राने त्याला वाचवण्यासाठी धडपड केली. त्याने स्वतःची पँट प्रथमेशच्या दिशेने फेकून त्याला ओढण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याची खोली जास्त असल्याने तो प्रयत्न निष्फळ ठरला.
घाबरलेल्या मित्राने तातडीने धावत जाऊन गावात ही माहिती दिली. बातमी कळताच ग्रामस्थांनी तलावाकडे मोठी गर्दी केली. मदतीसाठी आपत्कालीन पथकाला पाचारण करण्यात आले. ग्रामस्थांनी अथक प्रयत्न करून प्रथमेशचा मृतदेह बाहेर काढला, तर रात्री उशिरा जीवन आव्हाड याचाही मृतदेह सापडला. मात्र शोएब अयुब शेख याचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरूच होता.
घटनेची माहिती मिळताच सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. शोधकार्य सुरू ठेवण्यात आले असून प्रशासनाकडून मदतकार्य सुरू आहे.
दरम्यान, आमदार विठ्ठलराव लंघे यांनीही तात्काळ दखल घेत सुरक्षा रक्षक दलाला पाचारण केले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर चर्चा करून शोधकार्य व मदतकार्य जलदगतीने करण्याच्या सूचना दिल्या.
चौकट : सुरक्षेचा बोजवारा, कंत्राटदार गायब
या घटनेनंतर संबंधित कंत्राटदाराचे सुपरवायझर संजय हराळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आज सुटी असून येथील कर्मचारी घाबरून निघून गेल्याचे सांगितले. या तलावात सुमारे २० ते २५ फूट खोल पाणी असूनही परिसरात सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचे समोर आले आहे.
अनेक वर्षांपासून रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेमुळे तयार झालेला हा तलाव आता मृत्यूचा सापळा ठरत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.

