अर्ज बाद प्रकरणावर 25 नोव्हेंबरला लागणार निकाल न्यायालयाने दिली उद्याची तारीख
नेवासा नगरपंचायतीच्या निवडणुकीत छानणीदरम्यान अचानक निवडणूक आयोगाच्या आलेल्या आदेशामुळे नगराध्यक्षपदासह पाच प्रभागांतील उमेदवारांचे अर्ज बाद ठरवण्यात आले होते. बी-फॉर्मसंदर्भात न्यायालयाने मागवलेल्या तातडीच्या स्पष्टीकरणानंतर हे अर्ज अपात्र घोषित करण्यात आले. विशेष म्हणजे नगराध्यक्षपदाचे उमेदवार शंकरराव लोखंडे यांचा अर्ज आधी मंजूर असल्याचे सांगितले गेले; मात्र नंतर त्यांना परत बोलावून अर्ज नामंजूर झाल्याची माहिती देण्यात आली. या निर्णयाने निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया अधिक वादग्रस्त बनली.
या पार्श्वभूमीवर अपात्र ठरवलेल्या सहा उमेदवारांनी न्यायालयात पिटीशन दाखल करून दिलेल्या निर्णयाविरोधात लढा दिला आहे. पिटीशन दाखल करणाऱ्यांमध्ये नगराध्यक्षपदाचे शंकर लोखंडे, प्रभाग ३ मधील सचिन नागपुरे, प्रभाग ४ मधील विवेक ननवरे, प्रभाग ५ मधील निर्मला सांगळे, प्रभाग १० मधील निखिल जोशी आणि प्रभाग १५ मधील सुवर्णा नागपुरे यांचा समावेश आहे. या सहा प्रकरणांमुळे नेवासा निवडणूक अधिकच गुंतागुंतीची व अनिश्चिततेत सापडली आहे.
आज जिल्हा उच्च न्यायालयात या सहाही अर्जांवर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंच्या वकिलांची युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निर्मला सांगळे ,विवेक नन्नवरे, सचिन नागपुरे यांचे अपील फेटाळल्या असून उद्या, दिनांक २५ नोव्हेंबर रोजी, उरलेल्या तीन अपीलांचा निकाल देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या तीन उमेदवारांचे भवितव्य आता पूर्णपणे उद्याच्या निकालावर अवलंबून राहिले आहे. या सुनावणी दरम्यान निवडणूक अधिकारी यां नात्याने तहसीलदार संजय जी बिरादर आणि नगरपंचायतीचे कार्यकारी अधिकारी निखिल फराटे हे न्यायालयात उपस्थित होते

