क्रांतिकारी शेतकरी पक्षाची नगराध्यक्षाची उमेदवारी व चिन्ह बॅट
नेवासा, ता.२९
नेवासा शहराच्या बाजारपेठेला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतले जात असून बाजार समितीच्या माध्यमातून खुले कांदा मार्केट सुरू करण्याची तयारी जोरात सुरू आहे. नेवासा बाजारपेठ ऊर्जेत असतानाही आपले प्रथम कर्तव्य असल्याचे क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नंदकुमार पाटील यांनी सांगितले.
व्यापार व्यवहारांना गती देण्यासाठी “ मोकाट जनावरे मुक्त नेवासा”व तीर्थक्षेत्र र्यटन विकास प्रकल्प” राबवण्याची ग्वाही देत पाटील यांनी शहरातील व्यापारपेठ उर्जितावस्थेत आणण्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले. उमेदवारी जाहीर करताना त्यांनी व्यापारपेठ सुदृढ करणे आणि उपनगरातील मूलभूत सुविधा उभारणी यावर विशेष भर देणार असल्याचे नमूद केले.
नागरिकांना दिलासा देण्यासाठी घरपट्टी आणि पाणीपट्टीचा फेरआढावा घेऊन कर कमी करण्याचा निर्धारही पाटील यांनी व्यक्त केला. तसेच वाढीव शास्तीमुळे त्रस्त नागरिकांना शास्ती माफी देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी जाहीरनाम्यात केली आहे.
शहरातील शासकीय जागांवर अस्तित्वात आलेल्या वस्त्यांना कायदेशीर संरक्षण देऊन त्यांना हक्काचे दस्तऐवज देण्याचे काम प्राधान्याने हाती घेतले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर समाधानकारक तोडगा काढण्याची ग्वाही त्यांनी दिली.
तरुणांसाठी रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने मिनी एमआयडीसीचा प्रस्ताव तयार करण्याचे सांगत पाटील यांनी त्याचा पाठपुरावा गतीमान करण्याचे आश्वासन दिले. तसेच शहरातील पाणीटंचाई लक्षात घेता नवीन पाणीपुरवठा योजना तातडीने अमलात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची माहितीही त्यांनी दिली.

