नेवासा | प्रतिनिधी
नेवासा नगरपंचायतीसाठी शनिवार, २० डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २ मध्ये प्रचाराला वेग आला असून, संजय सुखदान यांनी मतदारांना थेट, स्पष्ट आणि आव्हानात्मक शब्दांत मतदानाचे आवाहन केले आहे.
“मत मागणाऱ्यांना प्रश्न विचारा, कामांचा हिशेब मागा,” असे ठाम आवाहन करत सुखदान म्हणाले की, २०१७ साली प्रभाग २ मधून सौ. शालिनी संजय सुखदान नगरसेविका झाल्यानंतर या प्रभागाचा चेहरामोहरा पूर्णतः बदलला आहे. खळवाडी व राजवाडा परिसरातील अंडरग्राउंड गटारी, काँक्रीट रस्ते, पाणीपुरवठा, शौचालये, हायमॅक्स दिवे, स्मशानभूमींचा सर्वांगीण विकास, देवगड रस्त्यावरील वाड्या-वस्त्यांपर्यंत वीजपुरवठा अशी अनेक ठोस कामे या काळात पूर्ण झाली आहेत.
ते पुढे म्हणाले, “२०१७ पूर्वी तब्बल १५ वर्षे सदस्य राहिलेले आज पुन्हा मत मागत आहेत. त्यांनी त्या काळात प्रभागासाठी नेमके कोणते ठोस काम केले, याचे उत्तर जनतेने मागावे. काम नसेल तर केवळ शब्दांवर विश्वास ठेवू नका.”
कोरोना काळात नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो, तसेच प्रत्येक सुख-दुःखात सक्रिय सहभाग ठेवला, असा दावा करत त्यांनी सांगितले की, मूलभूत सुविधांसोबतच नागरिकांच्या दैनंदिन समस्यांसाठी आम्ही २४ तास उपलब्ध आहोत.
यावेळी त्यांनी मतदारांना थेट आवाहन करत म्हटले,
“येणाऱ्या २० डिसेंबरला झाडू या चिन्हासमोरील बटन दाबून विकासाला कौल द्या. सौ. शालिनी संजय सुखदान यांना पुन्हा संधी द्या, आम्ही केवळ प्रभाग नव्हे तर संपूर्ण नेवासा शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत.”

