नेवासा : “समर्पण फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याला सत्तेची साथ मिळाली, तर नेवासा शहराचा विकास आणि तीर्थक्षेत्र उभारणी वेगाने साधता येईल,” असे महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व समर्पण फाउंडेशन प्रमुख डॉ. करणसिंह घुले यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्था सक्रिय व उत्तरदायी असल्या तरच सर्वांगीण प्रगती शक्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.
समर्पण फाउंडेशनने सोळा वर्षांत विविध उपक्रमांद्वारे वेगळा आदर्श निर्माण केला आहे. नेत्रदान, देहदान आणि अवयवदान चळवळीत ३८७ नेत्रदान, ७ हजार बांधकाम मजुरांना मदत, वारकऱ्यांची आरोग्य तपासणी आणि सात हजार मोफत मोतीबिंदू ऑपरेशन या कामांमुळे संस्थेने ग्रामीण भागात प्रभावी समाजजागृती केली.
शहर विकासाबाबत डॉ. घुले म्हणाले की, नेवासा सुजलाम–सुफलाम करणे हा त्यांचा संकल्प आहे. रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना कायमस्वरूपी जागा मिळावी यासाठी समर्पणने नगरपंचायतीपुढे सातत्याने पाठपुरावा केला असून पाणी, सांडपाणी, बागा आणि तरुणांसाठी क्रीडा संकुलाचे प्रश्न हातात घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बांधकाम मजुरांच्या हक्कांसाठी समर्पण फाउंडेशनने उभारलेल्या लढ्यामुळे शासनाला स्वतंत्र समूह आरोग्य विमा योजना लागू करावी लागली असून हजारो मजुरांना प्रत्यक्ष लाभ मिळत आहे.
नेवासा शहर व उपनगरातील भौतिक सुविधांना प्राधान्य देत शासकीय जागेवर उभ्या वस्त्यांना त्यांच्या नावावर जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. करणसिंह घुले यांनी सांगितले. क्रीडा संकुल विविध ठिकाणच्या बागा जॉगिंग ट्रॅक तसेच स्वच्छ नेवास सुंदर नेवासा केंद्रापासून गावपर्यंत पक्षाचे शासन असल्याने विकासाला गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

