बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बोकडांनीच बाजार गाजवला, आणि व्यापाऱ्यांना मोठा फायदा मिळवून दिला.
घोडेगाव **दिलीप शिंदे याज कडून**
– बकरी ईदच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी घोडेगावच्या चर्च परिसरात भरलेल्या बकऱ्याच्या बाजारात उसळलेल्या गर्दीमुळे तब्बल एक कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सकाळी सहा ते अकरा या अवघ्या पाच तासांत सातशे ते आठशे बोकडांची खरेदी-विक्री झाली.
यंदा शेळ्यांपेक्षा बोकडांची संख्या आणि मागणी अधिक होती. बाजारात आठ-दहा किलोपासून पन्नास-साठ किलो वजनाच्या बोकडांची आवक होती. भाऊराव ठोंबरे यांच्या माहितीनुसार, किमान ६०० ते ७०० बकरे कुर्बानीसाठी बाजारात आले होते. जागा अपुरी पडल्याने वाहनांची गर्दी मुख्य रस्त्यावर उसळली होती.
बाजारातील दर: लहान (८-१० किलो) बोकड : ₹१०,००० ते ₹१२,०००,मध्यम (२०-३० किलो) बोकड : ₹२५,००० ते ₹३५,०००,मोठा (४०-५० किलो) बोकड : ₹४५,००० ते ₹५५,००,विशेष बोकड (एकसंध रंग, चांद असलेले) : ₹६०,००० ते ₹८०,०००

व्यापारी शिवाजी ईखे, संतोष ईखे व बापू जाधव यांनी काही खास बोकडांचे दर ऐंशी हजारांपर्यंत पोहोचल्याचे सांगितले. संतोष कु-हाडे यांच्या दोन वर्षांच्या पंचावन्न किलोच्या अंदाजे वजनाच्या बोकडाला ₹६३,००० मोल लाभले.
गावरान, संगमनेरी, तोतापुरी आदी जातींचे बोकड बाजारात उपलब्ध होते. छत्रपती संभाजीनगर, बीड, नाशिक, पुणे येथूनही बकरे विक्रीसाठी आले होते. माल अपुरा पडल्याने दर उंचावले. मात्र, मेंढ्या-शेळ्यांबाबत मात्र मागणी व आवक कमीच असल्याचे चित्र होते.