नेवासा (प्रतिनिधी) – नेवासा नगरपंचायतीत कार्यरत सुमारे ७५ कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात ग्रामपंचायत काळापासून सुरू असलेली अनियमितता अद्यापही सुटलेली नाही. या मुद्द्यावर प्रशासनाने वेळोवेळी आश्वासने दिली, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे कर्मचारी संघटनांचा संयम आता सुटला आहे.
भारतीय मजदूर संघ नगरपंचायत शाखेचे अध्यक्ष कृष्णा डहाळे यांच्या नेतृत्वाखाली अन्यायग्रस्त कर्मचारी आगामी २४ जून २०२५ पासून नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत चक्री उपोषणाला बसणार आहेत. यासोबतच घंटानाद आंदोलनही करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मूळत: हे आंदोलन १९ जून रोजीच होणार होते, परंतु त्याच दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या महादिंडीचा पंढरपूर प्रस्थान सोहळा असल्यामुळे आंदोलन पुढे ढकलण्यात आले आहे. तरीही समस्या न सुटल्यास कर्मचाऱ्यांनी अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नास नगरपंचायत प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा देत कर्मचार्यांनी निधी तात्काळ नियमित करण्याची मागणी केली आहे.