जागतिक मृदा दिनानिमित्त विशेष कार्यक्रम
नेवासे
माती तपासणी हा आधुनिक शेतीचा पाया असून त्याद्वारे पीक उत्पादनात लक्षणीय वाढ साधता येते, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे यांनी केले. जागतिक मृदा दिनानिमित्त नेवासा तालुक्यातील खेडले काजळी येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
कृषी महाविद्यालय सोनई येथील कृषिदूत आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्याचे अधिकारी यांच्या उपस्थितीत मृदशास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी शेतकऱ्यांसोबत माती नमुना कसा घ्यावा याचे प्रात्यक्षिक सादर केले. त्यांनी जमिनीचे आरोग्य टिकवण्यासाठी आवश्यक असलेली खत व्यवस्थापन पद्धती, संतुलित पोषण योजना आणि योग्य वेळेवर माती परीक्षण करण्याचे फायदे सविस्तर स्पष्ट केले.
कृषिदूत पृथ्वीराज चौधरी, ओंकार मोरे, अतिश साबळे, सार्थक पाचोरे, ज्ञानेश्वर शिंदे, रुद्र सईवर आणि प्रज्वल डोके यांनी कार्यक्रमाचे समन्वयन करत माती नमुना संकलनाची सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाला खेडले काजळी येथील हरिभाऊ ढगे, सखा हरी ढगे, अजित ढगे, संजय उदे, आसाराम उदे, बाबासाहेब कोरडे, परसराम कोरडे, भगवान ढगे, सुदाम कोरडे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
कृषी अधिकारी लक्ष्मणराव सुडके यांनी कृषी विभागाच्या विविध योजना, अनुदान प्रक्रिया आणि तंत्रज्ञानाधारित शेतीविषयी माहिती दिली. कृषी सहाय्यक राहुल दांडगे आणि कृषी अधिकारी प्रशांत पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध कृषी ॲपची माहिती देत त्याचा उपयोग करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचा समारोप सरपंच बाळासाहेब येडू कोरडे यांच्या आभारप्रदर्शनाने झाला.

