नेवासा (प्रतिनिधी) – शासनाच्या विविध कृषी योजना शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी शेती शाळांचे नियोजन करावे, असे स्पष्ट निर्देश आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिले. पंचायत समिती नेवासा येथे आमदार लंघे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस तहसीलदार संजय बिरादार, उपविभागीय कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे, गटविकास अधिकारी संजय लखवाल, जलसंधारण अधिकारी प्रवीण दहातोंडे, सहाय्यक निबंधक देविदास घोडेकर आदी अधिकारी उपस्थित होते.
आमदार लंघे पुढे म्हणाले, “बनावट खतांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक रोखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कृषी विभागाने यासाठी सतर्क राहावे. कृषी विभागामार्फत कांदा चाळ, फळबाग अशा विविध योजना राबविल्या जातात. मात्र, या योजनांमध्ये काही अडचणी असून त्या जिल्हास्तरीय बैठकीत पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या जातील. तसेच, कृषी दुकानदारांना खते विक्री करताना येणाऱ्या अडचणींचाही मुद्दा बैठकीत मांडला जाईल.”
तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे यांनी खरीप हंगामासाठी नियोजित 31 विविध मोहिमांचे वेळापत्रक, रासायनिक खतांचा उपलब्ध साठा, मागील वर्षभरातील बोगस बियाण्यांवर झालेली कारवाई, कृषी प्रकल्प याबाबतची माहिती दिली.
कार्यक्रमात पात्र लाभार्थ्यांना यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून ट्रॅक्टर वाटप, गोपीनाथ मुंडे अपघात विमा धनादेश, कृषी सन्मान शेतकरी उत्पादक कंपनी पाचेगाव यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी ज्ञानेश्वर पेचे, अभिजीत पोटे, शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी अभिजीत लुनिया, अण्णासाहेब पटारे, महादेव दराडे, संजय वाघ, संजय लंघे, कैलास शिंदे, आदिनाथ पटारे तसेच तालुका कृषी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडल कृषी अधिकारी सुहास धस यांनी केले तर सूत्रसंचालन पंचायत समिती कृषी अधिकारी बाळासाहेब कासार यांनी केले.
खरीप 2024 मधील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची मंजुरी
खरीप 2024 मधील स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या आणि तक्रार दाखल केलेल्या 44,243 शेतकऱ्यांना एकूण 46.52 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. सदर रक्कम शेतकऱ्यांच्या आधार लिंक खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
चौकट 2
शेतीतील यांत्रिकीकरणाला चालना; ट्रॅक्टर आणि विमा धनादेशाचे वाटप
तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून ट्रॅक्टर वाटप करण्यात आले. तसेच गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेंतर्गत लाभार्थ्यांना धनादेश वितरित करण्यात आले. यावेळी कृषी सन्मान शेतकरी उत्पादक कंपनी पाचेगाव यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले