राष्ट्रीयकृत बँकांकडून सी बील स्कोअरच्या कारणावरून नाकारले जात आहे पिक कर्ज
शासन आदेश झुगारून बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक; आठ दिवसांत सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
नेवासा (प्रतिनिधी) – तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकांकडून सी बील स्कोअरच्या कारणावरून शेतकऱ्यांना पिक कर्ज नाकारले जात असून, यामुळे शासन आदेशाची पायमल्ली होत आहे. या बँकांवर कठोर कारवाई झाली नाही, तर आम आदमी पार्टीकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आम आदमी पार्टीने नेवासा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
शासनाने स्पष्ट आदेश दिले असतानाही बहुतांश बँका शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत. यामुळे शेतकरी खाजगी सावकारांच्या दुष्टचक्रात अडकत असून, भविष्यात कर्जबाजारीपणातून आत्महत्येच्या उंबरठ्यावर जाण्याची भीती ‘आप’ने व्यक्त केली आहे. आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना कर्ज न मिळाल्यास संबंधित बँकांवर शेतकऱ्यांसह आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदनावर अॅड. सादिक शिलेदार, प्रवीण तिरोडकर, देवराम सरोदे, अण्णासाहेब लोंढे, किरण भालेराव, संदीप आलवणे, सलीम सय्यद, विठ्ठल मैंदाड, करीम सय्यद, विठ्ठल चांडे, समित पटारे, मुन्नाभाई आतार, राजू महानोर यांच्या सह्या आहेत. निवेदन नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे यांनी स्वीकारले.