मुळा संस्थेचे पॉलिटेक्निक कॉलेज सुरू होणार!
नेवासे
नेवासा तालुक्यातील नामवंत मुळा एज्युकेशन सोसायटीच्या मुळा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, सोनई या महाविद्यालयाला २०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी पॉलिटेक्निक शाखांना AICTE नवी दिल्ली व महाराष्ट्र शासनाची मान्यता प्राप्त झाली आहे. याबाबत माहिती देताना संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांनी याचे श्रेय संस्थेच्या ४० वर्षांच्या शैक्षणिक परंपरेला व ग्रामीण विद्यार्थ्यांप्रती असलेल्या सामाजिक बांधिलकीला दिले.
या मान्यते अंतर्गत कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आर्टिफिशल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलि कम्युनिकेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे चार कोर्स ग्रामीण भागात सुरू होणं ही विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी मानली जात आहे. १० वी नंतर थेट पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेतल्यास ११ वी-१२ वीची आवश्यकता राहत नाही, तसेच JEE किंवा MH-CET सारख्या स्पर्धा परीक्षा देण्याचीही गरज उरत नाही. डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना थेट IT कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होतात, अथवा ते थेट दुसऱ्या वर्षाला इंजिनिअरिंग पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतात.
“१२ वी नंतर कमी गुणांमुळे इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठीही पॉलिटेक्निक हा उत्तम पर्याय आहे. त्यांच्या अभियंता होण्याच्या स्वप्नाला आमची संस्था दिशा देईल.”– उदयन गडाख
सोनईसारख्या ग्रामीण भागातच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याला दिशा देणाऱ्या या संस्थेमध्ये ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली अनुभवी व पात्र शिक्षकवर्ग आणि अत्याधुनिक प्रयोगशाळांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना प्रवर्गानुसार शिष्यवृत्ती तर मुलींना शासनाच्या नियमांनुसार मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे ग्रामीण मुलामुलींना स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी ही एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे.