प्रलंबित प्रश्नांवर कार्यकर्त्यांतून घेतला आढावा- शहरात लक्ष घालणार
विविध प्रलंबित प्रश्नांवर कार्यकर्त्यांतून घेतला आढावा
नेवासा (प्रतिनिधी) –
दि. २ जुलै रोजी भारतीय जनता पक्षाचे युवा नेते व खासदार मा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी नेवासा शहरातील भाजप जनसंपर्क कार्यालयाला भेट देत शहरातील प्रलंबित प्रश्नांचा कार्यकर्त्यांतून आढावा घेतला.
अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना, खासदार विखे पाटील हे नेवासा शहरातील ठाणगे कॉम्प्लेक्समधील भाजप शहराध्यक्ष मनोज पारखे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आले. यावेळी कार्यालयामार्फत सुरू असलेल्या जनसेवकांच्या उपक्रमांची माहिती त्यांनी जाणून घेतली.
या दरम्यान, नेवासा शहरातील खोलेश्वर गणपती चौकात मनोज पारखे व त्यांच्या सहकाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत त्यांचे जल्लोषात स्वागत केले. गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर सुजय दादांनी कार्यालयात उपस्थित युवकांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले.
भेटीदरम्यान मनोज पारखे व निरंजन डहाळे यांनी शहरातील प्रलंबित प्रश्नांबाबत विखे यांचे लक्ष वेधले. विशेषतः शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या वाटपाचा विषय, पाणीटंचाईचा प्रश्न, तसेच नागरी सुविधांबाबत चर्चा झाली. या प्रश्नांची गंभीर नोंद घेत विखे पाटील यांनी “स्वतः पाठपुरावा करून हे प्रश्न मार्गी लावू,” असे आश्वासन दिले.
यावेळी नुकतीच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेवर सचिवपदी नियुक्त झालेल्या आदिनाथ पटारे यांचा गौरव खासदार विखे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर समर्पण फाउंडेशनचे डॉ. करणसिंग घुले यांनी जायकवाडी धरणाच्या पाण्याच्या अधिकृत कार्यक्षेत्रात वाढ करून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळावा, यासाठी खासदार साहेबांकडे मागणी केली.
कार्यक्रमास भाजपचे राजेश कडू पाटील, शिवाजी लष्करे, महेश पारखे, अशोक मारकळी, आकाश कुसळकर, रामदास लष्करे, ऋषिकेश शहाणे प्रसिद्धीप्रमुख आदिनाथ पटारे, रोहित कोकाटे, गोविंद कदम, गणेश गाढवे, श्रीराम लष्करे, माऊली जाधव, अशोक टेकणे, ज्ञानेश्वर पेचे, बाळासाहेब दारुंटे, किरण दारुंटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.