बालयोगी ऋषिनाथजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन, तर विजय महाराज पवार यांची कीर्तनसेवा
नेवासा (प्रतिनिधी) :-
सालाबादप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमेनिमित्त नेवासा येथील श्री मधमेश्वर देवस्थान येथे भक्तिमय वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा होत आहे. हा उत्सव ब्रह्मलीन योगीराज मनोहरनाथजी महाराज व गुरुदेव पीर योगी बाबा रुद्रनाथजी महाराज यांच्या पावन स्मृतीस वंदन करत, बालयोगी ऋषिनाथजी बाबाजी यांच्या प्रेरणेने संपन्न होत आहे.
या गुरुपर्वाच्या दिवशी गुरुवार, १० जुलै २०२५ रोजी सकाळी ८ वाजता गुरूपूजन व अभिषेकाने उत्सवाला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर सकाळी १० ते १२ या वेळेत प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. विजय महाराज पवार यांची कीर्तनसेवा होणार आहे. त्यांच्या भक्तिरसात न्हालेल्या प्रवचनातून श्रोत्यांना अध्यात्मिक ऊर्जा आणि मार्गदर्शन लाभणार आहे.

कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरुकृपा अनुभवावी, असे आवाहन बालयोगी ऋषिनाथजी महाराज व श्री मधमेश्वर देवस्थान समितीने केले आहे.
भाविक, शिवभक्त व गुरुसेवक यांनी या पवित्र प्रसंगी सहभागी होऊन आत्मिक आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.