गुरु हेच जगाचे कृपाळू मायबाप श्रद्धा ठेवा……
नेवासा
तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याला राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सुमारे तीन लाख भाविकांची उपस्थिती लाभली. श्री गुरुदेव दत्त पीठाचे प्रमुख हभप गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उत्सवामध्ये अखंड हरिकीर्तन, अभिषेक व महाआरतीने वातावरण भक्तिमय झाले होते. “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा…” आणि “श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा की जय” च्या गजरात संपूर्ण देवगड नगरी निनादली.
उत्सवाची सुरूवात पहाटेच्या सुमारास भगवान दत्तात्रय व श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या समाधीस अभिषेकाने झाली. हा विधी गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज व त्यांचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या शुभहस्ते पार पडला. त्यानंतर ज्ञानसागर सभामंडपामध्ये गुरु-शिष्य परंपरा, गुरु महिमा व संतकृपेच्या प्रभावावर हरिकीर्तन घेण्यात आले. यावेळी भास्करगिरी महाराज म्हणाले की, संत हे जगाचे खरे कृपाळू मायबाप असून त्यांनी उभारलेली विचारप्रणाली ही समाजाच्या कल्याणासाठी आहे. गुरूंबद्दलची श्रद्धा शेवटच्या श्वासापर्यंत टिकवावी, असे भावनिक आवाहन त्यांनी उपस्थित भाविकांना केले.
या कार्यक्रमानंतर गुरुपौर्णिमा निमित्त गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज आणि स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांचे भाविकांनी संतपूजन केले. त्यानंतर झालेल्या महाआरतीच्या वेळी देवगडचे दत्त मंदिर प्रांगण भक्तांच्या गर्दीने फुलून गेले. परिसरातील वातावरण जयघोषांनी भरून गेले. मंदिर परिसरात अनेक पूजावस्तू आणि प्रसाद विक्रीसाठी दुकाने उभारण्यात आली होती, त्यामुळे यात्रेस स्वरूप आले होते
उपस्थित मान्यवरांमध्ये संतसेवक हभप दिनकरजी महाराज मते, गुरुवर्य बाबांच्या मातोश्री सरुआई पाटील, स्वामींच्या मातोश्री सौ. मिराबाई मते, नारायण महाराज ससे, डॉ. जनार्धन महाराज मेटे, गणपत महाराज आहेर, संतसेवक बाळू महाराज कानडे, तात्या महाराज शिंदे, नामदेव महाराज कंधारकर, मृदुंगाचार्य गिरीजीनाथ महाराज जाधव, अमोल महाराज बोडखे, रामनाथ महाराज पवार, संजय महाराज निथळे, शुभम महाराज बनकर, सेवेकरी बबनराव वरघुडे, दिनकरराव कदम, ज्ञानदेव लोखंडे, बद्रीनाथ फोलाणे, रामेश्वर तनपूरे यांचा समावेश होता. तसेच संभाजीनगर, नगर आणि मुरमे येथील भक्तमंडळ व स्वच्छता समितीचे सेवेकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी आलेल्या हजारो भाविकांनी गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज आणि स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांचे दर्शन घेतले. देवगडचे मुख्य प्रवेशद्वार, सिद्धेश्वर मंदिर व किसनगिरी बाबा समाधी मंदिर येथे भाविकांची विशेष गर्दी झाली होती. संपूर्ण सोहळा शिस्तबद्ध, भावपूर्ण आणि भक्तीरसात न्हालेला होता.