गुरुकृपेसाठी वाहिलेल्या भक्तिरचनांनी भारावलेले वातावरण, रसिक श्रोत्यांची टाळ्यांची उधळण !
नेवासा(प्रतिनिधी) –
“गुरु म्हणजे दीप… अंधारात मार्ग दाखवणारा; गुरु म्हणजे गंगा… जीवनदायी ज्ञानवाहिनी!”
अशा गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा गुरुपौर्णिमा उत्सव श्रीरामपूर येथे भक्तिभावात आणि भावनांनी नटलेल्या सूरावटीत संपन्न झाला.
पूर्णवादी भक्त मंडळ आणि श्री पारनेरकर गुरु सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ९ जुलै रोजी, रामभक्त कै. ल.खा. उर्फ दादासाहेब देशपांडे स्मृती सभागृहात झालेल्या भक्तिसंगीताच्या विशेष कार्यक्रमात, छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध गायक बंधू पं. राम विधाते व बजरंग विधाते यांनी सादर केलेल्या भक्तिरचना म्हणजे एक आत्मिक अनुभूती होती.
विधाते बंधूंना व्हायोलिनवर डॉ. सुरेश विधाते, तबल्यावर सागर काटे, मंजिरीवर कृष्णकुमार विधाते व अक्षय, आणि बासरीवर गुलाब चव्हाण यांची उत्कृष्ट साथ लाभली. त्यांची जुगलबंदी म्हणजे संगीतातून उगम पावलेली एक साधनाच होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरविंद पाटील, प्रमोद मुठाळ (ज्येष्ठ नागरिक संघ), डॉ. विनू लावर, सुधीर गुलदगड, तसेच जीवन कला मंडळ श्रीरामपूर येथील सर्व सदस्यांनी समर्पणाने परिश्रम घेतले.
गुरुपौर्णिमेच्या या भक्तिपर्वाने श्रीरामपूरमध्ये भक्तिरसाची गंगा वाहिली… आणि प्रत्येक श्रोत्याच्या अंत:करणात ‘गुरुकृपा हीच खरी अमृतवृष्टी’ हे सत्य अधोरेखित झाले.