गुरुपौर्णिमेनिमित्त सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमात भक्तिभावपूर्ण कार्यक्रम
नेवासा (प्रतिनिधी) –
गुरुपौर्णिमा म्हणजे भारतीय आध्यात्मिक परंपरेतील एक पवित्र आणि अनमोल पर्व. ज्ञान, शिस्त, संस्कार यांचे केंद्र असलेल्या गुरुंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. “गुरु ही एक विचारधारा असून ती समाजाला योग्य मार्गावर नेण्याचे कार्य करते,” असे विचार महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त व्यक्त केले.
सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रम, सुरेगाव रोड, नेवासा बुद्रुक येथे आयोजित प्रवचनरूपी कार्यक्रमात ते बोलत होते. सकाळच्या सत्रात यजमानांच्या हस्ते ब्रम्हलीन सद्गुरू नारायणगिरी महाराज आणि अन्य सकल देवतांचे विधिवत पूजन करण्यात आले.
महंत उद्धव महाराज पुढे म्हणाले की, “माऊली ज्ञानोबारायांनी आपल्या सद्गुरूंचे केलेले वर्णन हे अत्यंत समर्पक आणि भावपूर्ण आहे. गुरूचे महत्त्व समजून घेण्यासाठी साधकाने मौन न राखता त्याचा उद्गाराने गौरव करावा. देव, शास्त्र, संत, माता-पिता तसेच जीवनातील योग्य मार्ग दाखवणारी प्रत्येक व्यक्ती यांचे आपल्या जीवनावर ऋण असते.” निसर्गाचे संतुलन राखण्यात प्रत्येक घटकाचे मोलाचे योगदान असल्याचे सांगून, उद्धटपणाबद्दल निसर्ग कसा प्रत्युत्तर देतो याचाही त्यांनी जागर केला. “सामान्य जनतेला योग्य दिशा दाखवण्याचे कार्य गुरु करतात,” असा उपदेश त्यांनी दिला.
या कार्यक्रमानंतर विविध सेवा कार्यात योगदान देणाऱ्या दात्यांचा सत्कार करण्यात आला. आश्रमाचे शिक्षक बाळासाहेब झिने यांनी सूत्रसंचालन केले. प्रवचनानंतर अन्नदान सेवा पार पडली. ही सेवा आप्पासाहेब सखाराम भागवत, रखमाजी लक्ष्मण नाचन, भिका खोसे आणि अक्षय नानासाहेब पंडित यांच्या वतीने करण्यात आली.

कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, सौ. सुवर्णाताई राजेंद्र विखे पाटील, सौ. सुनीताताई गडाख, पोलीस उपनिरीक्षक धनंजय जाधव, साई आदर्श मल्टिस्टेटचे संस्थापक शिवाजीआप्पा कपाळे, विश्वनाथ मंडलिक, सोमनाथ महाराज पाटील, अंकुश महाराज जगताप, शिवप्रसाद महाराज पंडित, हरिभाऊ महाराज भोगे आदी मान्यवर उपस्थित होते.