विवेकानंदनगर मधील महिला दुकानदाराची सोनसाखळीची झाली चोरी
नेवासा (दि. 18 जुलै)
: स्वामी विवेकानंद नगर येथे गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडलेल्या चैन स्नॅचिंगच्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली. कांताबाई उसालाल चोरडिया या आपल्या दुकानात असताना गिऱ्हाईक बनून आलेल्या अनोळखी तरुणाने कोल्ड्रिंक्स व आईस्क्रीम मागण्याच्या बहाण्याने त्यांच्याजवळील अडीच तोळ्यांची सोनसाखळी हिसकावून घेतली. दुसरा साथीदार बाहेर शाईन मोटारसायकलवर तयार होता. दोघेही क्षणार्धात पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार व डीबी पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्यात आला असून, चोरट्यांची ओळख पटल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
कांताबाई चोरडिया यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नेवासा पोलीस ठाण्यात जबरदस्ती चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
दरम्यान, पोलिसांनी परिसरातील पोलीस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा देत नाकाबंदीही केली होती, मात्र चोरट्यांना पसार होण्यात यश मिळाले. लवकरच गुन्हा उघडकीस आणू, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली असून, नागरिकांनी मौल्यवान दागिन्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन नेवासा पोलिसांनी केले आहे.