संत परंपरेच्या साक्षीने ज्ञानेश्वर मंदिर परिसरात स्वच्छतेची भक्तिपर सेवा
ज्ञानेश्वर देवस्थानचे महंत वेदांताचार्य ह.भ.प. देविदास महाराज म्हस्के यांनी स्वतः झाडू हाती घेऊन परिसरात स्वच्छता केली.
नेवासा
संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना केलेल्या पावन पैस खांब मंदिरात, कामिका एकादशी निमित्त सोमवारी (दि. 21 जुलै 2025) मोठ्या भक्तगणांच्या उपस्थितीत यात्रा पार पडली. लाखो वारकऱ्यांच्या गर्दीनंतर परिसरात साचलेल्या निर्माल्याचे व्यवस्थापन ही एक मोठी जबाबदारी होती.
या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 22 जुलै 2025) यशवंत सामाजिक प्रतिष्ठान, सोनई महाविद्यालय व श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वच्छता वारी, माऊलींच्या दारी” हा उपक्रम राबविण्यात आला.
संत तुकाराम महाराज मंदिर ते ज्ञानेश्वर मंदिर परिसरात सकाळी 8 ते 11 दरम्यान ही स्वच्छता मोहीम पार पडली. या उपक्रमाचे मार्गदर्शन माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी केले, तर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मोहीम यशस्वीरीत्या पार पडली.
या मोहिमेत महाविद्यालयीन विद्यार्थी, प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे ज्ञानेश्वर देवस्थानचे महंत वेदांताचार्य ह.भ.प. देविदास महाराज म्हस्के यांनी स्वतः झाडू हाती घेऊन परिसरात स्वच्छता केली.
याप्रसंगी त्यांनी सांगितले की, “आषाढी वारीनंतर अनेक भाविक ज्ञानेश्वर माऊलीच्या दर्शनासाठी आवर्जून येतात. पंढरपूर प्रमाणेच ज्ञानेश्वर मंदिर परिसरही स्वच्छ ठेवणे हीच खरी सेवा आहे.” तसेच, “यशवंत सामाजिक प्रतिष्ठानने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपूर व सोनई येथे स्वच्छतेची वारी पूर्ण केली आहे, हे कौतुकास्पद आहे,” असे त्यांनी नमूद केले.
या उपक्रमात पुढील मान्यवर आणि कार्यकर्ते सहभागी होते:
अभय गुगळे, आशिष कावरे, सुनील साळुंके, रामकिसन कांगुणे, डॉ. ईश्वर उगले, रणजित सोनवणे, दिनेश व्यवहारे, योगेश रासने, जालु गवळी.

तसेच श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण घनवट, उपप्राचार्या राधा मोटे, डॉ. बाळासाहेब खेडकर, प्रा. डॉ. जगदीश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांसह विशेष सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या सांगतेप्रसंगी प्रा. अमोल जाधव यांनी विद्यार्थ्यांसह “पासायदान” गायन करून वातावरण मंत्रमुग्ध केले.
या उपक्रमामुळे “मंदिर स्वच्छ – मन निर्मळ” हा संतांचा विचार कृतीत उतरल्याचे भाविकांनी समाधानाने नमूद केले.