तांत्रिक अडचणींमुळे सहा महिने रखडलेल्या अनुदानासाठी प्रशासन सज्ज – लाभार्थ्यांनी २५ जुलै रोजी उपस्थित राहण्याचे आवाहन
नेवासा (प्रतिनिधी) –
विशेष सहाय्य सहाय्य योजनेतील कोणत्याही लाभार्थ्याचे अनुदान बंद झालेले नसून केवळ तांत्रिक अडचणीमुळे ते थांबले आहे. आणि ही तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी दोन दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन नेवासा तहसील कार्यालय येथे आयोजित केले आहे. नेवासा तालुक्यातील श्रावणबाळ, संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, आणि इंदिरा गांधी दिव्यांग योजना या विशेष सहाय्य योजनेंतर्गत अनुदान वंचित लाभार्थ्यांसाठी येत्या २५ जुलै २०२५ रोजी नेवासा तहसील कार्यालयात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि सामाजिक जाणिवेतून घेतलेल्या पुढाकारामुळे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
सदर योजनांमध्ये आधार डेबिट प्रणालीतून थेट अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी तांत्रिक त्रुटींमुळे गेल्या सहा महिन्यांपासून अनेक लाभार्थ्यांना अनुदान मिळणे थांबले होते. आधार क्रमांक जुळत नसणे, नावातील चूक, बायोमेट्रिक त्रुटी, हयातीचे दाखले यांसारख्या अडचणींमुळे हे प्रकरण रखडले होते.
या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधून आमदार विठ्ठलराव लंघे यांनी पावसाळी अधिवेशनात राज्याचे विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवळ यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतरच जिल्हा प्रशासनाला विशेष शिबिर आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत
या शिबिरात लाभार्थ्यांची आधार कार्डशी संलग्नता आणि नाव दुरुस्ती ,बायोमेट्रिक प्रमाणीकरण हयातीचा दाखला व इतर तांत्रिक पूर्तता केली जाणार आहे त्यामुळेप्रत्येक लाभार्थ्याने सर्व आवश्यक कागदपत्रांसह ठरलेल्या दिवशी तहसील कार्यालयात हजर राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
आमदार लंघे यांनी सामान्य नागरिकांच्या अडचणीला सरकारदरबारी आवाज दिला आणि त्याचा थेट परिणाम म्हणजे हे विशेष शिबिर. केवळ मागणी करून थांबून न राहता, मंत्र्यांशी थेट चर्चा करून प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्यास प्रवृत्त करणारा हा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा प्रभावी हस्तक्षेप ठरतो.
“जनतेच्या प्रश्नांवर गतीने काम करणे हीच माझी जबाबदारी आहे. कोणीही अनुदानापासून वंचित राहू नये यासाठीच हा विशेष शिबिर उपक्रम हाती घेतला आहे,” असे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी यावेळी सांगितले.
चौकट– तालुक्याचा आकडा :
एकूण लाभार्थी – १०,०००, कोणत्याही लाभार्थ्याचे अनुदान बंद झालेले नसून केवळ तांत्रिक अडचणीमुळे रखडलेली पूर्तता – ९०० लाभार्थी शिबिराद्वारे सर्व पूर्तता पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना अनुदान वितरीत करण्याचे उद्दिष्ट