व्यापाऱ्यांच्या व बाजारपेठेच्या भल्यासाठी नेवाशात नवे पाऊल
–
नेवासा (प्रतिनिधी) –
शहरातील व्यापाऱ्यांच्या दीर्घकालीन हिताचा विचार करत “अतिक्रमणमुक्त, शाश्वत आणि सुसज्ज बाजारपेठ” यासाठी नेवासा शहरातील व्यापारी वर्गाने पुढाकार घेत व्यापारी संघटनेची स्थापना केली आहे. कोणताही राजकीय हस्तक्षेप न ठेवता व्यापारी हिताच्या दृष्टीने केवळ व्यावसायिक समन्वयावर आधारित ही संघटना तयार करण्यात आली असून, ती प्रशासनाशी हातमिळवणी करून नव्या व्यापारी संकुलांच्या उभारणीसाठी प्रयत्नशील राहणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून वेळोवेळी झालेल्या अतिक्रमणहटाव मोहीमांमुळे बाजारपेठेची वाताहत झाली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येत नव्या आशेने संघटनाची मुहूर्तमेढ रोवली आहे.
या संघटनेची पहिली बैठक दिनांक २३ जुलै २०२५ रोजी पार पडली. बैठकीत शहरातील विविध व्यापारी विभागांतील प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लवकरच विभागनिहाय बैठका घेऊन प्रशासनासोबत संयुक्त व्यापारी मेळावा घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
बैठकीत प्रास्ताविक कुणाल मांडण यांनी केले तर आभार रुपेश उपाध्ये यांनी मानले. यावेळी संजय सुखदान, महेश मापारी, मनोज पारखे, स्वप्नील मुनोत, सुलेमान मणियार, संदेश शिंगी, सचिन सावंत, पिंटू परदेशी, लक्ष्मीकांत डहाळे, अमोल सुरोशे, बब्बू बागवान यांसह अनेक व्यापारी सदस्य उपस्थित होते.

ही संघटना व्यापाऱ्यांचे हक्क जपत, नियोजनबद्ध बाजारपेठ निर्माण करून व्यवसायास नवी दिशा देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
शहराच्या विकासात व्यापाऱ्यांचा मोलाचा वाटा असतो, हे लक्षात घेऊन प्रशासनानेही सकारात्मक भूमिका घेत सहकार्य करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.